Press "Enter" to skip to content

एपीएमसी चा अजब गजब कारभार :ज्यावर करायची कारवाई त्याचाच होतोय सत्कार

उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही अविनाश देशपांडे यांच्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची विषेश कृपादृष्टी

पहा हा धक्कादायक वृत्तांत 👇

सिटी बेल • नवी मुंबई •

नवी मुंबई मधल्या वाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कारभारात प्रचंड स्वरूपात अनागोंदी दिसून येते. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा बोलबाला असणाऱ्या या समितीमध्ये ज्या सहसचिव महोदयांवर कारवाई व्हायला हवी त्यांचाच भव्यदिव्य स्वरूपात सत्कार होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालयाच्या सफाई कंत्राटमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दस्तुरखुद्द मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सुरेश मारू नामक शौचालय चालविणार्‍या ठेकेदाराला कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कात्रीत पकडून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची मलई गोळा केली ठेकेदाराकडून भ्रष्टाचार रुपी मलई खाऊन देखील त्याला ठेंगा दाखविल्यानंतर सुरेश मारू याने शशिकांत शिंदे यांच्या सकट त्यांच्या भ्रष्टाचारी साथीदारांना न्यायालयात खेचले. ५ जानेवारी २०२२ रोजी सन्माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणातील दोषींची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या आदेशांचे पालन झाले आहे की कसे याबाबत उच्च न्यायालयाला २० एप्रिल पर्यंत आढावा देण्यासाठी दंडक देखील दिलेला आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमवेत आज ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यातीलच एक आहेत सहसचिव अविनाश देशपांडे. महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे ,विशेष कार्य अधिकारी असणारे अविनाश देशपांडे यांच्यावरती ३५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप सुरेश मारू यांनी केला होता. सन्माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश नुरूप तूर्तास अविनाश देशपांडे यांच्यावर कारवाई अभिप्रेत होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती करता सन्माननीय कृषी पणन संचालकांनी मंजूर केलेल्या सेवा नियम अनुसार अशा प्रकारची चौकशी सुरु असलेल्या इसमास सहसचिव पदावरती राहण्याचा अधिकार नाही. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त व अपील नियम 1979 अन्वये जर एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात खटल्याचे अन्वेषण चौकशी किंवा न्यायचौकशी चालू असेल तर त्यांना निलंबन आधीन ठेवावे लागते.

असे सगळे असले तरी देखील २८ फेब्रुवारी रोजी सहसचिव अविनाश देशपांडे निवृत्त होणार असल्यामुळे त्यांचा भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निरोप समारंभात त्यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला. विशेष म्हणजे या निरोप समारंभाला भ्रष्टाचारासाठी हातात हात धरून त्यांची साथ करणारे अनेक दिग्गज आवर्जून उपस्थित राहिले होते ज्यामध्ये प्रामुख्याने शौचालय घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार शशिकांत शिंदे, निवृत्त पणन संचालक सतीश सोहनी, उपसचिव शिंगाडे, मालमत्ता तसेच एफएसआय घोटाळ्यातील आरोपी सुधीर तुंगार उपस्थित होते.

सदरचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. ज्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी त्यांचा जर आस्थापनेत सत्कार होत असेल तर प्रशासन नक्की कुठेतरी पेंड खाते आहे! अशा संशयाला जागा आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालयांच्या देखभाल व दुरुस्ती ठेका प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्या विरोधात संबंधितांवर कारवाई व्हावी म्हणून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार महेश शिंदे यांनी देखील विधान परिषदेत अधिवेशनादरम्यान आवाज उठवला होता. यावेळी सहकार व पणन मंत्रालयाकडून संबंधित दोषी व्यक्तींवरती कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.

न्याय चौकशी सुरू असलेल्या अधिकार्‍याच्या निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युटी यांची ताबडतोब देयके देणे हा देखील भयंकर प्रकार आहे.या प्रकरणात देशपांडे यांना कुशन करून निसटू देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी साधण्यात आला. अविनाश देशपांडे यांची भविष्य निर्वाह निधीचा आणि ग्रॅज्युटी चे तसेच अन्य वेतन असे धनादेश त्यांना याच समारंभात सुपूर्द करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.