Press "Enter" to skip to content

घरगुती गॅस पुरवठा नियमित : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम राखावा

रोहा -प्रतिनिधी : याकूब सय्यद

सध्या जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि, तालुक्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही, अशी माहिती तहसिलदार रोहा डॉ.किशोर देशमुख यांनी दिली आहे.

घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणारा एलपीजी गॅस केवळ घरगुती कारणांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी घरगुती गॅसचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार व भारत पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेड व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेड या तेल विपणन कंपन्यांच्या नियमानुसार साठेबाजी व काळाबाजार रोखण्याकरीता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दोन बुकिंगमध्ये किमान 25 दिवसांचा कालावधी असणे आवश्यक आहे. त्यामुळे एका सिलेंडरचे वितरण झाल्यानंतर 25 दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलेंडरचे बुकिंग करता येते. तसेच तालुक्यातील सर्व गॅस वितरकांना बुकिंगनंतर विहीत मुदतीत लवकरात लवकर ग्राहकांना सिलेंडर डिलीव्हरी करणेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. बुकिंग संदर्भात किंवा कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा.

नागरिकांनी घरगुती गॅसचा अनावश्यक साठा करून ठेवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवून घाईगडबडीत गॅस घेण्याचा प्रयत्न करू नये. घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी संयम राखावा व प्रशासनास सहकार्य करावे. तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी शांतता राखून नियमित पद्धतीने गॅसचा वापर करावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.