Press "Enter" to skip to content

गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या !’च्या जयघोषात रसायनी दुमदुमले

फुलांची उधळण, भक्तिमय वातावरणात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप;विसर्जन घाटांवर पोलीस, अग्निशमन दल व स्वयंसेवकांचा चोख बंदोबस्त

रसायनी (आनंद पवार) गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या! एक,दोन,तीन, चार..गणपतीचा जयजयकार!अशा जयघोषांनी तसेच फुलांची उधळण करत रसायनी परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. भक्ती,श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
गणरायाच्या आगमनानंतर अवघ्या दीड दिवसांतच बाप्पाला निरोप देण्याची वेळ आल्याने भाविकांच्या डोळ्यांत भक्तिभावासोबतच विरहाची भावना दिसून आली.‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत भाविकांनी गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी नेल्या. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पाच्या जयघोषाने आणि फुलांच्या वर्षावाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

रसायनी परिसरातील विविध गावांमध्ये व वसाहतींमध्ये घरगुती पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायांचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले.रिस, मोहोपाडा तलाव तसेच पाताळगंगा नदीकिनारी असलेल्या विसर्जन घाटांवर दीड दिवसांच्या मुक्कामासाठी आलेल्या गणरायांचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.

विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली होती.रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी,हेल्प फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक,
अग्निशमन दलाचे जवान तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी विसर्जन घाटांवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहुल तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील विविध विसर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, विसर्जन प्रक्रिया आणि भाविकांच्या सुरक्षिततेवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले.

दरम्यान,शांतता, शिस्त आणि भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या!’या जयघोषाने रसायनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.दीड दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पा भक्तांचा निरोप घेऊन मार्गस्थ झाले असले, तरी पुढील वर्षीच्या आगमनाची आतुरता भाविकांच्या मनात आत्तापासूनच निर्माण झाली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.