बनावट प्रत सही, शिक्का वापरून फसवणूक
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाची महिलेने
बनावट प्रत सही व शिक्का वापरून न्याय देवतेचीच फसवणूक केल्याचा प्रकार कर्जत मध्ये घडल्याचे समोर आलं.आरोपी महिलेने बनावट सही, शिक्काचा वापर करून तयार केलेल्या न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत मुथुट फायनान्स या कंपनीसाठी वापरल्याने ही बाब समोर आली. ठाणे जिल्ह्यातील दिवा गावातील ही महिला असून तिच्या विरोधात आता कर्जत पोलीस ठाण्यात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांच्या न्यायलायत ठाणे जिल्ह्यातील दिवा गावात राहणारी आरोपी महिला कोमल इंदिकर यांचा फौजदारी खटला सुरू आहे. आरोपी महिलेने खटला क्रं.93/2017 मधील निशाणी 65 वरील 3 फेब्रुवारी 2023 रोजी न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाची महिलेने बनावट प्रत न्यायालयाचा बनावट शिक्का व सही तयार करून तो वापरुन दि.21 एप्रिल 2023 रोजीचा बनावट आदेश स्वत:च्या फायदयाकरीता तयार करुन तो बनावट असताना हे माहिती असून देखील बनावट आदेश खरा म्हणुन मुंबई धाराशिव येथील मुथुट फायनान्स शाखा येथे सादर केला होता. ही बाब समोर आल्याने कोमल इंदिकर या आरोपी महिलेने न्याय देवतेची फसवणूक करून फायनान्स कंपनीची देखील फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने या महिले विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस संगीता गावडे ह्या अधिक तपास करीत आहेत.
Be First to Comment