जमीन खरेदी केलेल्या दस्ताची साक्षांकित प्रत मिळविण्यासाठी मागीतली लाच
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी केल्यानंतर त्या सरकारी दस्ताची साक्षांकित प्रत मिळविण्यासाठी अधिकचे पैसे मागितले जात होते. त्याबद्दल जमीन खरेदी करणारे व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे दाद मागितली. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या पथकाने सापळा रचून लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडले.त्याबद्दल कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून लाच घेणारी व्यक्ती खासगी असल्याने त्या प्रकरणाच्या मागे दुय्यम निबंधक कार्यालयात काम करणारे कोणी सरकारी कर्मचारी होते काय ? याचा तपास पोलीस करीत आहेत.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी एक या कार्यालयात तक्रारदारांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी कर्जत तालुक्यात जमीन खरेदी केली होती आणि त्या जमिनीच्या खरेदी दस्ताची साक्षांकित प्रत काही दिवसांनी दिली जात असते. संबंधित जमीन खरेदीदारांनी त्या दस्ताच्या दहा प्रती दुय्यम निबंधक कार्यालयात साक्षांकित कडून मागवल्या होत्या. संबंधित दस्त्याच्या प्रती मिळविण्यासाठी कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय येथे काम करणारे खासगी कर्मचारी मोहन गायकवाड यांनी तक्रारदार यांचे कडे सात हजार रुपयांची मागणी केली. ही तक्रार प्राप्त होताच ठाणे लाचलुचपत विभाग यांच्या अखत्यारीत असलेल्या नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला तैनात करण्यात आले.
संबंधित लाच लुचपत विभागाचे पथकाने खात्री करून कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला. या कार्यालयात काम करणारा खासगी इसम मोहन पुंडलिक गायकवाड (वय ३५ वर्षे रा. मुक्काम बीड, ता. कर्जत, जि. रायगड ) यास नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पंचासमक्ष रुपये सात हजार लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न होवुन कारवाईदरम्यान आरोपी यांना तक्रारदार यांच्याकडून रुपये सात हजार लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर सापळा कारवाई यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग रायगडचे उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलिस हवालदार प्रदीप जाधव, नितीन पवार, पोलिस हवालदार रतन गायकवाड, पोलिस नाईक संतोष तम्हाणेकर , महिला पोलिस नाईक उमा बासरे , योगेश नाईक, सचिन माने, निखिल चौलकर यांनी ही कामगिरी केली.

Be First to Comment