Press "Enter" to skip to content

रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक

पनवेल(प्रतिनिधी) आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संदर्भातील विविध समस्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेला शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केले.

मंत्रालयात नामदार अजित पवार यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, थोर देणगीदार व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार विश्वजित कदम, इतर पदाधिकारी, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    

     रयत शिक्षण संस्था ही ७५० हून अधिक शाखा आणि या वर्षात सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे. "श्रमप्रेमी शिक्षण" ही संस्थेची खास ओळख आहे. रयत शिक्षण संस्था ही समाजातील सर्व स्तरांतील लोकांना, विशेषतः सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित घटकांना शिक्षण देण्यास कटिबद्ध आहे.आजच्या वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत, सध्याच्या शिक्षणपद्धतीचे सर्व स्तरांवर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिकीकरण आणि उदारीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रातील संकल्पना आणि संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे पारंपरिक अध्यापन पद्धतींपासून थोडेसे बाजूला जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नव्या शिक्षणविधींचा स्वीकार करणे काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून, रयत शिक्षण संस्थेने नव्या प्रवाहांशी जुळवून घेण्याची प्रक्रिया सक्रियपणे सुरू केली आहे.आधुनिक काळातील शैक्षणिक बदलांशी जुळवून घेत संस्था सातत्याने गुणवत्ता आणि मूल्याधारित शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या कार्यात येणाऱ्या अडचणी आणि धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवत रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्यास शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.