
“समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव”
पनवेल : प्रतिनिधी
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगार, उद्योग आणि प्रॉडक्ट मार्केटिंगच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने “सखी कर्तृत्वाचा सन्मान” हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगरसेविका सौ. ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि गार्गीज् ग्रुप, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी भा.ज.पा. प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय, पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. प्रमिला पाटील, ॲड. स्मिता पाटील, डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे, सौ. अर्चना परेश ठाकूर (कोशिश फाउंडेशन) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच मा. नगराध्यक्ष चारुशीला घरत, नगरसेविका सरस्वती काथारा, दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, प्रियंका कांडपिळे, सारिका भगत, अरुणा दाभणे, वंदना बहिरा, रेणुका मोहकर, मंजुळा कातकरी तसेच अर्बन बँकेच्या संचालिका सौ. माधुरी गोसावी यांचीही विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित नगरसेविकांचा तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे समाजाच्या पायाभूत स्तरावर निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, हॉस्पिटलमधील आया, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच शाळांमधील आया या महिला कर्मचाऱ्यांचा “सखी कर्तृत्वाचा सन्मान” या माध्यमातून गौरव करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक प्रेरणादायी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. परंपरागत बुरूड व्यवसाय जपणाऱ्या श्रीमती सुलोचना पांडुरंग खैरे (वय ८५) आणि श्रीमती सुशीला अनंत खैरे (वय ८०) यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ हा व्यवसाय जपल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ. दिपा दिलीप पनवेलकर, श्रीमती स्मिता सदानंद साखरे, कमकुबेन भारवाड आणि ज्योतीबेन चावडा यांचा सन्मान करण्यात आला. सुरक्षा क्षेत्रात प्रामाणिक सेवा देणाऱ्या सौ. वनिता मेघराज मांजरेकर (१९ वर्षे सेवा) आणि सौ. अनिता रामचंद्र माळी (अमिटी युनिव्हर्सिटी येथे ५ वर्षे सेवा) यांचाही गौरव करण्यात आला.

सामाजिक कार्यासाठी शुभा चंदेरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी आदिवासी समाजातील महिलांना लोणचे बनवण्याचे प्रशिक्षण देऊन बचत गट उभारणे, प्रदर्शनांमध्ये स्टॉलची संधी उपलब्ध करून देणे तसेच आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण आणि दारूमुक्ती मोहिमेद्वारे समाजकार्य केले आहे.
महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या सौ. शैला दीपक खाडे यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांना सोशल एंटरप्रेन्योर, रायगड भूषण, महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्राची हिरकणी असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
स्वतःच्या कष्टातून कुटुंब उभे करणाऱ्या टिफिन व केटरिंग व्यवसायातील श्रीमती सुरेखा चाळके, सौ. सारिका तुपे आणि श्रीमती सुलभा विठ्ठल धनावडे यांचा सन्मान करण्यात आला. वाहतूक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ. अनिता विजय मागडे (शाळा बस चालक) आणि सौ. आशा दादासाहेब घालमे (रिक्षा चालक) यांचाही गौरव करण्यात आला.
अंगणवाडी क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या सौ. अरुणा किसन गवते (४१ वर्षे सेवा) आणि श्रीमती सुनिता अशोक पाटील (२० वर्षे सेवा) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. शोभा हरिश्चंद्र जाधव, सौ. दर्शना महादेव पाटील आणि सौ. सुनीता रमेश जाधव या आशा वर्कर महिलांचाही गौरव करण्यात आला. नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या सौ. विशाखा विजयकुमार ठाकूर (२४ वर्षे सेवा, NMMC वाशी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
याशिवाय विशेष सन्मानामध्ये सौ. अपेक्षा जगदीश वाघमारे (ग्रामसखी), तेजस्विनी संदीप गोंधळी (Heaven In A Bite), श्रीमती सीमा अजय शेटे, सौ. नूतन संकेत रानडे, बेबीताई, सौ. हेमा दीपक कुदळे तसेच महिला पोलीस शिपाई साधना मोहन पवार यांचा गौरव करण्यात आला.
पनवेल व परिसरातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्याचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये पनवेल स्मार्ट मम्मीज् (सौ. शितल रितेश ठक्कर), एकता महिला मंडळ (अध्यक्षा सौ. सुनिता गोविंद खरे), संवेदना महिला मंडळ (फाउंडर सौ. सुनेत्रा प्रसाद गव्हाणकर), डायमंड फाउंडेशन (फाउंडर सौ. नम्रता ज्ञानदेव धनवडे), जागृती फाउंडेशन (अध्यक्ष सौ. गौरी क्षीरसागर), दिशा मंच (फाउंडर सौ. नीलम विकास अंधारे), छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबे (अध्यक्षा सौ. रंजना विश्वनाथ सुरते), सहकार भारती महानगर जिल्हा पनवेल महिला प्रमुख ॲड. सौ. अपर्णा सुधीर नाडगौडी, सप्तशृंगी महिला मंडळ कळंबोली (अध्यक्षा सौ. ज्योती रविंद्र पाटील) आणि वाणी समाज मंडळ पनवेल (अध्यक्षा सौ. पूजा प्रसाद साखरे) यांचा समावेश होता.
कार्यक्रमात महिलांसाठी स्वयंरोजगार, उद्योगाच्या संधी तसेच प्रॉडक्ट मार्केटिंग व सेलिंग या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी भेटवस्तू तसेच लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. PNG ज्वेलर्स आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्या सहकार्याने लकी ड्रॉसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
“समाजात अशा अनेक महिला आहेत ज्या कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आपल्या कामाशी निष्ठा ठेवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. त्या सोशल मीडियावर किंवा मोठ्या मंचांवर दिसत नसल्या तरी त्यांच्या परिश्रमामुळे समाजाची भक्कम पायाभरणी होते. ‘सखी कर्तृत्वाचा सन्मान’ या उपक्रमाच्या माध्यमातून अशाच विविध स्तरांवर शांतपणे काम करणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून काही निवडक महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
सौ.ममता प्रितम म्हात्रे
भाजपा नगरसेविका
पनवेल महानगरपालिका
कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी घेतलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, सहभागी महिला आणि सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.




Be First to Comment