
बिल काढले नाही म्हणून ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला ;मारहाणीमध्ये बोटाचे हाड तुटले
पनवेल तालुक्यातील कोळखे ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावातील अंतर्गत गटारे आणि मुख्य गटार आरसीसी पाईपलाईन बांधकामाचे बिल काढले नाही म्हणून ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कॉन्ट्रॅक्टरच्या सहकाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निलेश म्हात्रे व संदेश कदम अशी आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की ग्रामपंचायत अधिकारी रेवन्नाथ ढेरे यांच्याकडे चिपळे आणि कोळखा ग्रामपंचायतींचा अधिकार आहे. याच दोन ग्रामपंचायतीमधील कामाचा अहवाल सादर करण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी ते पनवेल पंचायत समिती कार्यालयात गेले होते. साधारणपणे साडेअकरा ते बाराच्या दरम्यान काम संपवून बाहेर पडत असताना त्यांना निलेश म्हात्रे व संदेश कदम यांनी अडविले. सदर दोन्ही इसम कॉन्ट्रॅक्टर अतुल दत्तात्रय मालकर याचे सहकारी आहेत. कोळखे येथे अंतर्गत गटारे आणि मुख्य गटार आरसीसी पाईपलाईन बांधकामाचे बिल का काढले नाही असे विचारत निलेश म्हात्रे आणि संदेश कदम हे ढेरे यांना दरडावू लागले. तू माझा फोन का उचलत नाहीस असे तारस्वरात विचारत या दोघांनी अर्वाच्य शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच ढेरे यांचा हात जबरदस्तीने धरून त्यांना आमच्या सोबत चल असे म्हणून ओढू लागले. ढेरे यांनी जाण्यास नकार दिल्याबद्दल त्या दोघांनी बुक्के आणि लाथा यांचा वापर करत ढेरे यांच्यावर हल्ला चढविला. पनवेल पंचायत समिती कार्यालय आवारातील नागरिक ढेरे यांच्या मदतीला धावून आले म्हणून त्यांची सुटका झाली. यादरम्यान हल्लेखोरांनी पोबारा केला. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करता गेले असता ढेरे यांच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले.
रेवन्नाथ ढेरे यांच्या अर्जावरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात निलेश म्हात्रे व संदेश कदम यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील वाघ हे सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.



Be First to Comment