

जय गुरुदेव कॉम्प्लेक्स परिसरातील वीज यंत्रणेकडे महावितरणचे दुर्लक्ष; दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
कामोठे : दत्ता कुलकर्णी :
कामोठे येथील सेक्टर १७ मधील जय गुरुदेव कॉम्प्लेक्सच्या बाजूला तसेच परिसरातील अनेक ठिकाणी महावितरणच्या विद्युत वितरण पेट्या (डीपी) उघड्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. डीपीमधील उघड्या वायरींमुळे सोसायटीतील लहान मुले, पादचारी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच महावितरण प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जय गुरुदेव कॉम्प्लेक्सजवळील डीपी रस्त्याच्या कडेला असल्याने या मार्गावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यातच परिसरात इंडो स्कूल असल्यामुळे शाळकरी मुलांचाही वावर असतो. अशा परिस्थितीत उघड्या डीपी आणि त्यातील वायरींमुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विद्युत यंत्रणा सुरक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे.
या समस्येबाबत यापूर्वी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसेच, उघड्या डीपींचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत वारंवार लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

महावितरणकडून वीजबिल भरण्यास उशीर झाल्यास ग्राहकांना तत्काळ नोटिसा पाठवल्या जातात; मग नागरिकांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेच्या प्रश्नांकडेही तितक्याच तत्परतेने लक्ष का दिले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. वीजपुरवठा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
पनवेल परिसरातील सर्व उघड्या डीपींची तपासणी करून त्यांची दुरुस्ती करावी, खराब किंवा असुरक्षित वायरी बदलून डीपींना मजबूत झाकणे व सुरक्षित कुलूप लावावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे अपघातांचा धोका कमी होण्यासोबतच अनधिकृत हस्तक्षेप आणि संभाव्य वीजचोरी रोखण्यासही मदत होऊ शकते.
आता तरी महावितरण प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा, दुर्घटना घडण्यापूर्वीच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.



Be First to Comment