
पनवेल, दि.२७ (वार्ताहर) : राज्यभरातून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या पनवेल एसटी बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार समोर आली आहे. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नसल्याने विकतच्या बाटल्या घेऊन तहान भागवावी लागत आहे. प्रवाशांच्या या मूलभूत गरजेकडे एसटी प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
पनवेल हे महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून, येथील बसस्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसची प्रतीक्षा करताना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रवाशांना नाइलाजाने पैसे खर्च करून पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागत आहेत.

प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेणाऱ्या एसटी प्रशासनाला बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता येत नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. प्रवाशांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना, त्यासाठीही प्रवाशांना खिशाला कात्री लावावी लागत असेल, तर ही बाब गंभीर आहे.
बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने डोळेझाक केल्यास प्रवाशांच्या अडचणी कायम राहणार आहेत. त्यामुळे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.



Be First to Comment