Press "Enter" to skip to content

पनवेलच्या क्रिकेटला पुन्हा गतवैभव मिळणार!आधुनिक क्रिकेट मैदानासाठी १.२६ कोटींचा प्रस्ताव; सुमित झुंजारराव यांचा पुढाकार


पनवेल, दि.२७ (वार्ताहर) : एकेकाळी संपूर्ण रायगड जिल्ह्यात दबदबा निर्माण करणाऱ्या पनवेलच्या क्रिकेटला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरात आधुनिक क्रिकेट मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत मांडण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार, प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत प्रभाग क्रमांक १४ मधील भूखंड क्रमांक ५०८ (पार्ट) आणि ५२० (पार्ट) येथे क्रिकेट मैदान उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नगरसेवक तथा भाजपचे पनवेल शहराध्यक्ष सुमित उल्हास झुंजारराव यांनी या मैदानासाठी पुढाकार घेतला आहे.

एकेकाळी पनवेलच्या क्रिकेटविश्वात सोसायटी, युनिटी, नानू फुलवाद, हरिओम, नवज्योत, स्मॅश, इलेव्हन फायटर आणि मंगलमूर्ती यांसारख्या संघांनी आपला ठसा उमटवला होता. मिडल क्लास सोसायटी आणि व्ही. के. स्कूलच्या मैदानांवर नियमित सराव करून अनेक गुणवंत खेळाडू घडले. मात्र, वाढते शहरीकरण आणि मैदानांची कमतरता यामुळे क्रिकेट सरावासाठी उपलब्ध जागा कमी होत गेल्या. परिणामी, स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सराव सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

प्रस्तावित मैदानात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी झुंजारराव यांनी केली आहे. मैदानाच्या चारही बाजूंना संरक्षक कुंपण उभारून वाहनांचा प्रवेश रोखणे, एकाच वेळी सात ते आठ संघांना सराव करता येईल इतक्या सराव विकेट्स तयार करणे, तसेच मध्यभागी दर्जेदार टर्फ विकेट उभारणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे लेदर बॉलवरील सामने आणि क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणेही शक्य होणार आहे.

आधुनिक सुविधांनी सज्ज मैदान उपलब्ध झाल्यास पनवेलमधील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सरावासाठी हक्काची जागा मिळेल. स्थानिक क्रिकेटला चालना मिळण्यासोबतच नव्या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होऊन पनवेलच्या क्रिकेटला पुन्हा नवी उभारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ओज

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.