
पनवेल, दि.२८ (वार्ताहर) : दिवाळीच्या सुट्टीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य मोफत आयोजित करावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुलांमधील मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता त्यांना मनोरंजनासोबतच सांस्कृतिक अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
यासंदर्भात २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात जाधव यांनी पुणे महानगरपालिकेच्या उपक्रमाचा संदर्भ दिला आहे. पुणे महानगरपालिकेने मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांचा कल इतर उपक्रमांकडे वळविण्यासाठी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक मोफत उपलब्ध करून दिले होते. त्याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकेनेही दिवाळीच्या सुट्टीत बालनाट्याचे आयोजन करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
नाटकाच्या माध्यमातून मुलांना मनोरंजनासोबतच कला, संस्कृती आणि रंगभूमीची ओळख होऊ शकते. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी नाटक मोफत दाखविण्याची व्यवस्था करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



Be First to Comment