
पनवेल, दि. २७ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ या घोषणेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील चौकात निदर्शने व आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी कथित मतचोरी आणि जनमताची चोरी यासंदर्भातील विविध मुद्दे व उदाहरणे सातत्याने जनतेसमोर मांडली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम मात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. आंदोलनादरम्यान ‘ज्ञानेश कुमार हटाओ, देश बचाओ’, ‘वोट चोर, गद्दी छोड़’ आणि वोट चोर कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में!’ अशा विविध घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर दुमदुमून गेला. आंदोलनाला येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक आणि आश्वासक ठरला.

- काँग्रेस नेत्यांचा मतचोरीच्या मुद्द्यावरून हल्लाबोल
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमित दवे म्हणाले की, केंद्र सरकारच्या केवळ घोषणांना जनता आता कंटाळली असून, जनतेच्या मूलभूत प्रश्नांबरोबरच लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे जनतेसमोर मांडला असून, या विषयावर देशभरात जनजागृती होत आहे.
महानगरपालिका विद्यमान नगरसेवक लतीफ शेख म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत असून, या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष जनतेमध्ये जागृती निर्माण करत आहे.
माजी जिल्हाध्यक्ष सुदामजी पाटील ह्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार स्थापन व्हावे, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना असून, त्या दिशेने सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना हेमराज म्हात्रे यांनीही आपली भूमिका प्रभावीपणे मांडली. या सर्व नेत्यांनी कथित मतचोरीचा मुद्दा तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या दोन्ही विषयांवर परखड भाष्य केले.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेसअध्यक्षा श्रुती शाम म्हात्रे ह्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि जनतेच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या आंदोलनाला पनवेल शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, ज्येष्ठ नेते, महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमित दवे, महानगरपालिकेचे नगरसेवक लतीफ शेख, ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक यशवंत सावळेकर, ज्येष्ठ नेते शशिकांत बांदोडकर, माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, माजी महिला जिल्हाध्यक्ष निर्मला मात्रे, माजी युवक जिल्हाध्यक्ष हेमराज महात्रे, माजी युवक प्रदेश सरचिटणीस आदित्य सावळेकर, ज्येष्ठ नेते सुधीर मोरे, शाहिद मुल्ला, विकास भारतीय, राजाभाऊ दवे, सागर पगारे, अमित जगनाडे, आरती ठाकूर, नीता शेनॉय,अलका ठाकूर,चैताली ठाकूर, सुनंदा घरत यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या आणि काँग्रेसप्रेमी नागरिक उपस्थित होते.
लोकशाहीचे रक्षण, मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी काँग्रेसचा संघर्ष यापुढेही सुरू राहील, असा निर्धार यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



Be First to Comment