

पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील इतिहास कालीन असणाऱ्या अंतोरा धरणाला तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येथील रखडलेले काम सुरू होणार असल्याने धरणाचे काम जवळपास १५ नोव्हेंबर पर्यंत पुर्ण होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सदरच्या धरणाच्या बांधकामाचे काम काही अंशी शासनाच्या दुर्लक्षामुळे रखडल्याने येथील पेण शहरासह तरणखोप, अंतोरा, नवघर, सापोली, बेडे व वरेडी या परिसरातील शेतकऱ्यांना फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या शेतीसाठी पाण्याची समस्या भेडसावत होती.त्यातच यावर्षी पर्जन्यस्थीती कमी प्रमाणात झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे लक्षात घेत माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी याबाबत पाटबंधारे विभागाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला असता तात्काळ याची दखल पाटबंधारे विभागाने घेऊन माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्यासमवेत उपअभियंता गीतांजली मंडलिक, सहाय्यक अभियंता रत्नदीप वासनिक आणि कनिष्ठ अभियंता संजय जाधव या सर्वांनी धरणाची संयुक्त पाहणी केली व यंदाची दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता या धरणाच्या बांधकामाचे काम करण्याचे निश्चित करून ते येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.या कामामुळे धरणात पाणी साचून भुजल मध्ये वाढ होणार आहे तसेच शेतीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने हे काम येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची अशी ग्वाही उपअभियंता गीतांजली मंडलीक यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी अंतोरे ग्रामपंचायत सरपंच अमित पाटील, माजी सरपंच रोहिदास पाटील, राजा पाटील, संदेश पाटील यांच्यासह अंतोरा, नवघर, बेडे, सापोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Be First to Comment