Press "Enter" to skip to content

दि बा प्रेमींचे स्वप्न पूर्ण होणार

लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिटी बेल ∆ पनवेल ∆ हरेश साठे ∆

डिसेंबर अखेरीस विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल त्यावेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री बुलंद तोफ देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे आज झालेल्या भव्य जाहीर प्रचार सभेत दिली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मैदानावर झाली. त्यावेळी ते बोलत होते.
       

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, महानगर प्रमुख योगेश चिले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण,  भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशिला घरत, जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्र्विनी पाटील, भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अल्पसंख्याक समाजाचे जिल्हाध्यक्ष मन्सूर पटेल, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर आदी उपस्थित होते. या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले कि, १९९० मध्ये विमानतळ होणार स्वप्न पहिले होते, पण प्रत्यक्षात विमानतळ साकारण्याचे काम मोदीजींनी केले. मेट्रो, विमानतळाच्या कामाचा पाठपुरावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आणि त्यांना खासदार श्रीरंग बारणे यांची साथ मिळाली. भूमिपुत्रांना सोबत घेऊन येथील चित्र विकासात बदलण्याचे काम झाले असून अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. आणि त्यामुळे हा परिसर आर्थिक राजधानी होणार आहे. पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात विकास करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असल्याचे सांगतानाच येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम असतो. पनवेल महानगरपालिकेला अमृत योजना असू द्या किंवा जीएसटीचा परतावा मिळवून द्यायचा श्रेय मला ते देत असले तरी खरा श्रेय त्यांचे आहे. दरवर्षी ७२ कोटी रुपये जीएसटी ऐवजी आता ४०० कोटी रुपये जीएसटी परतावा त्यांच्याच पाठपुराव्यातून शक्य झाला आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद करताना पनवेल परिसरात जास्तीत जास्त विकासकामे करून घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असतो, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या परिसरात विमानतळ, मेट्रो तसेच इतर महत्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या अनुषंगाने परिसराचा विकास झाला पाहिजे यासाठीही नेहमी आमदार प्रशांत ठाकूर यांचा आग्रह राहिला आहे.  आमदार प्रशांत ठाकूर कार्यसम्राट आहेत, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या मतांचा रेकॉर्ड पनवेल तोडणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हि देशाच्या अस्त्तित्वाची निवडणूक आहे त्यामुळे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकते तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच. पूर्वी देशाच्या इन्फ्रा स्ट्रक्चरवर दरवर्षी एक लाख कोटी रुपये खर्च केले जायचे पण मोदी सरकार आल्यावर दरवर्षी १३ लाख कोटी रुपये खर्च करून प्रकल्प, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला त्यामुळेच आपला देश मोठ्या प्रमाणात विकास करू शकला, असेही फडणवीस यांनी सांगितले. शेतकरी, मच्छिमार, कामगार यांचा विचार मोदींनी केला असे सांगतानाच विश्वकर्मा योजनेतून बारा बलुतेदारांचा विचार मोदीजींनी केला आणि आपल्या देशाच्या इतिहास पहिल्यांदाच असे घडले आहे. असेही त्यांनी म्हंटले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हंटले कि, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम शिंदेनी केले आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असतील पण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार नाहीत, असा घणाघाती त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. महायुतीच्या मेट्रोला नरेंद्र मोदी नावाचे इंजिन आहे. त्यामुळे त्यामागे कितीही बोगी जोडल्या जाऊ शकतात. इंडिया आघाडीतील सगळेच स्वत: इंजिन असल्याचे सांगतात. प्रत्येकजण बोगी स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांचं इंजिन हलतही नाही आणि डुलतही नाही. इंडिया आघाडीच्या इंजिनला डबेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या इंजिनमध्ये फक्त घरातलीच माणसे बसू शकतात. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसतील. त्यामुळे त्यांच्याकडे सामान्य माणसाला जागा नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेट्रोत देशातील तळागाळातील घटकांसाठी जागा आहेत.  सबका साथ सबका विश्वास या अनुषंगाने मोदीजी काम करत आहेत तर इंडिया आघाडी म्हणजे २४ पक्षांची खिचडी झाली आहे, अशा टोलाही त्यांनी हाणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी वैश्विक नेतृत्व आहे. भारतात मोदींमुळे लस तयार झाली आणि आपल्या देशासोबत जगालाही संजिवनी दिली त्यामुळे जगातील १०० देश भारताच्या पाठीशी आहेत, असेही फडणवीस यांनी नमूद केले. कॉग्रेस सरकार असताना बॉम्बस्फोट झाल्यावर फक्त पाकिस्तानचा निषेध करायचे पण मोदीजी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केले आणि आता पाकिस्तनाची हिंमत पण होत नाही. भारत चंद्रयान पाठवतो आणि तिकडे पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन उभा आहे, यातूनच नेतुत्व सिद्ध होत आहे. असेही त्यांनी म्हंटले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपला हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून श्रीरंग बारणे यांना लोकसभेत पुन्हा पाठवा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलताना गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मतदार संघात अनेक कामे केल्याची माहिती दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत असून विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत तर विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते फक्त टीकात्मक मुद्दे घेऊन फिरत आहेत, असेही त्यांनी म्हंटले. दहा वर्षे मला प्रेम दिले यापुढेही द्या आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभेत काम करण्याची संधी द्या असे आवाहनही बारणे यांनी केले. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नवा दिले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करताना पनवेलच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहे असे नमूद करून पनवेल महानगरपालिकेसंदर्भातील शास्ती कर माफ करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची ग्वाही दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले काम विश्वासात बदलले आणि हा विश्वास गॅरेंटीमध्ये बदलला. आणि संपूर्ण देशामध्ये विकासाचे पर्व निर्माण झाले. विमानतळाचे काम लवकर पूर्ण होऊन या ठिकाणी हजारोंच्या संख्येने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव लागले पाहिजे हि सर्व भूमिपुत्रांची प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे आणि त्याला देवेंद्रजी फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे त्याबाद्दल मी आभार मानतो.  अटल सेतू पूर्ण झाले आता उरण ते चौक ३२०० कोटींचा महामार्ग तयार होऊन या परिसराचा संपर्क अधिक वाढणार आहे. पनवेल महापालिकामध्ये अमृत योजना मिळाली, न्हावा शेवा टप्पा ३ मधून दरदिवशी १५० एमएलडी पाणी मिळणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. येथील विजेच्या संदर्भात सुविधांसाठी ४८० कोटींचा निधी, जीएसटीचा परतावा, अशी अनेक कामे देवेंद्रजी फडणवीस यांनी करत पनवेलच्या विकासाला चालना दिली आहे. असेही त्यांनी नमूद केले. महानगरपालिकेचा टॅक्स भरू नका टॅक्स माफ करून देतो अशा काही लोकांनी वल्गना केल्या, नागरिकांना टॅक्स भरू दिला नाही, त्यामुळे महानगरपालिकने मालमत्ताधारकांना नोटीस पाठवल्या आणि शास्ती लागल्या. वल्गना करणाऱ्यांचे ते स्वार्थी राजकारण होते. पण डबल टॅक्सेस रद्द करा अशी आमची मागणी आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी आपल्या मागणीतून अधोरेखित केले.

सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा आढावा मांडला. भाजपने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, तर देशातील प्रत्येक समाजाच्या उन्नतीसाठी काम करत आहे. देशाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सज्ज राहू या आणि आपल्या मावळ लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा मताधिक्याने विजयी करू या.                            – अविनाश कोळी, जिल्हाध्यक्ष- भाजप

शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आणि या अनुषंगाने काम करत बाबासाहेबांनी दिलेली राज्य घटना समृध्द करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ताकद तर आमदार प्रशांत ठाकूर यांची जनशक्ती पाठीशी आहे, त्यामुळे खासदार श्रीरंग आप्पा बारणे प्रचंड मतांनी विजयी होतील.     – शिवदास कांबळे, प्रदेश चिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस

आप्पा बारणे यांनी केलेल्या कामाचा धडाका सर्वांना माहिती आहे मात्र विरोधक स्वतःच्या स्वार्थासाठी अप्रचार करत आहे. पण सुज्ञ नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
– परेश पाटील,  उपजिल्हा प्रमुख – शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिलांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आणि त्यामुळे देशातील कन्या ते ज्येष्ठ महिलांना त्याचा लाभ होतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार ही काळाची गरज बनली आहे.                                       – चारुशीला घरत, जिल्हा सरचिटणीस- भाजप

जेव्हापासून मुख्यमंत्री पद गेले तेव्हापासून उध्दव ठाकरे रडके झाले आहेत. बाळासाहेबांच्या तत्वांना मूठमाती देऊन काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे खऱ्या शिवसेनेने त्यांना पक्षातून हाकलून दिले आहे.                                    – योगेश चिले, मनसे – महानगरप्रमुख

भाजप जातीयवादी नाही तर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी काम करणारा पक्ष आहे, संविधानाचा सन्मान करण्याचे काम मोदी सरकारने केला. सत्ता आल्यावर अनुसूचित जातीचे रामनाथ कोविंद यांना तर त्यानंतरच्या काळात आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करून तळागाळातील घटकांचा सन्मान केला आहे.                                    – ॲड. प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस – भाजप

देशाची महती जगात उज्वल करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसच्या काळात देशाच्या सीमा असुरक्षित होत्या देश भयभीत होता. पण मोदी सरकार आल्यानंतर देशाच्या भविष्यासाठी मोदीजींनी पावले उचलली आणि अतिरेक्यांच्या कचाट्यातून मुक्त होत देश सुरक्षित झाला आहे.                                    – नरेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष – आरपीआय

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.