रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पूर्ण केला
5500 कोटींचा व्यवसाय टप्पा
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ धनंजय कवठेकर ∆
राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रणी जिल्हा सहकारी बँक म्हणून लोकप्रिय असणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नुकताच आपला 5500 कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून सहकार क्षेत्रातील रोल मॉडेल बँक म्हणून आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, सहकारातील प्रभावी धोरण आणि तंत्रज्ञान स्नेही म्हणून बँकेने वेळोवेळी केलेले बदल यामुळे बँकेने हा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. राज्यातील सहकार क्षेत्र तसेच नाबार्डने बँकेच्या या कामगिरीचे कौतुक केलेले असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण त्यांच्या समवेत सांपत्तिक स्थितीमधील भरीव कामगिरी आणि प्रभावी व्यवस्थापन याबद्दल बँकेचे अभिनंदन केले आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मंदार वर्तक यांनी याबाबत माहिती देताना रायगड जिल्ह्रातील ग्राहकांनी बँकेवरती दाखविलेला विश्वास आणि बँकेचे सन्मा.चेअरमन आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांच्या दुरदृष्टीकोनातून हा प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत होत आहे याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच बँकेने या आर्थिक वर्षात सीकेवायसीचे काम पूर्ण केलेले असून यामुळे देशभरातील कोणत्याही बँकेत व्यवहार करण्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकाला एकच क्रमांक उपलब्ध होणार असून त्याचाही लवकरच प्रचार आणि प्रसार ग्राहकांपर्यंत केला जाणार आहे असे आश्वस्त केले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्रातील शेती आणि शेती आधारीत पुरक व्यवसायांना कर्जपुरवठा करीत असून त्याच्या समवेत इतरही व्यवसाय आणि उद्योजकांना कर्जपुरवठा करीत असल्यामुळे जिल्ह्रातील अनेक ग्राहकांचे बँकेशी तत्परतेचे नाते तयार झाले आहे. तसेच गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था, जिल्ह्यातील सहकारी पतपेढ्या , अर्बन को-ऑप.बँका या जिल्हा सहकारी बँकेशी जोडल्यामुळे सहकारातून सहकाराची वृध्दी हे आजवर बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी जपलेले धोरण आम्ही यशस्वीरीत्या पुढे नेत आहोत आणि त्यामध्ये बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बँकेच्या ग्राहकांशी आपुलकीचे नाते जपत आहेत, याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी समाधान व्यक्त करत बँकेचे ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले.
Be First to Comment