कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महेंद्र घरत उतरले ब्रिटनच्या रस्त्यावर
सिटी बेल • लंडन •
८०० निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावरती परत घ्या! अशी भूमिका घेत इंटक चे राष्ट्रीय सचिव, न्यू मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी थेट लंडन च्या रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन छेडले.नुकत्याच झालेल्या या आंदोलनामुळे महेंद्र शेठ घरत यांचा डंका लंडनमध्ये वाजल्याची चर्चा सर्वत्र झडत आहे.
पी अँड ओ,दुबई पोर्ट वर्ल्ड या कंपनीचे लंडन येथे कार्यालय आहे. त्यांनी निलंबित केलेल्या आठशे कामगारांना तातडीने कामावर घ्यावे यासाठी वर्ल्ड ट्रेड युनियनच्या नेत्यांनी तीव्र आंदोलन केले. महेंद्र शेठ घरत यांनी हिरीरीने पुढाकार घेत हे आंदोलन यशस्वी करून दाखवले याबद्दल त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे.
आपल्या नेत्याने राष्ट्रीय सीमा ओलांडत थेट ब्रिटनच्या राजधानीत आवाज बुलंद केल्यामुळे महेंद्र घरत यांच्या युनियन मधील तमाम कामगार बांधवांच्यात खुशीचे वातावरण आहे. महेंद्र घरत सध्या लंडनमध्ये असून ते सोमवारी शेलघर येथे परतणार आहेत असे सूत्रांकडून समजते.
दुबई पोर्ट (DPW) व सिंगापूर (PSA) या परदेशी कंपन्या भारतात आपले प्रकल्प उभारतात परंतु येथील कामगारांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. कामगारांना वेतन कमी दिला जातो, कामगारांच्या सुरक्षा व आरोग्य यांना प्राधान्य दिला जात नाही, कामगारांचा मानसिक छळ केला जातो, महिला कामगारांना नाईट शिफ्ट दिली जाते, जर कामगारांनी आपल्या हक्कांसाठी संघटना केली तर त्यास मुद्दामहून व्यवस्थापन मान्यता देत नाही. जे कामगार संघटना करण्यासाठी पुढाकार घेतात त्यांना तडकाफडकी कामावरून काढले जातात. यामुळे कंपन्यांविरोधात कामगारांमध्ये रोश आहे. या कंपन्यांविरोधात भारतातच नव्हे तर संपूर्ण जागतिक पातळीवर, इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन या बहुराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून लंडन येथे निदर्शने करण्यात आली. दिनांक २० ते २२ एप्रिल २०२२ रोजी लंडन येथे या कंपन्यांतील कामगारांच्या समस्यांसंदर्भात जागतिक पातळीवर चर्चा करण्यात आली. न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा ITF लंडन या बहुराष्ट्रीय संघाचे लॉजिस्टीक्स विभागाचे व्हा. चेअरमन, कामगार नेते महेंद्र घरत यांनी भारतीय संघटनांचे प्रतिनिधित्व केले व भारतीय कामगारांचे प्रश्न जगासमोर मांडले.
कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने जागतिक पातळीवर ITF या संघावर आपले स्थान निर्माण करून उरण – पनवेल नवी मुंबई, रायगड मधील लॉजिस्टीक्स (CFS) मधील कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत.
Be First to Comment