जर्नेलसिंग अन् विद्याची लेक दिलशाकौरच्या कवितांना ‘ग्लोरियस सागा’ मध्ये स्थान
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
ऐतिहासिक महाड शहरात दोन पिढयांपासून वास्तव्य असलेल्या चष्मेविक्रेते जर्नेलसिंग गौड यांच्या अन् जनकल्याण रक्तपेढीतील विद्या पवार गौड यांच्या संसारवेलीवरील निरागस फुल दिलशाकौर हिने केलेल्या तीन कवितांचा राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोरियस सागा’ या प्रातिनिधीक भावनासंग्रहामध्ये समावेश झाला आहे. वडील पंजाबी आणि मराठी आई असलेल्या लेकीच्या इंग्रजी कविता देशभर वाखाणल्या जात आहेत.
सध्या पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये सिव्हील इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या दिलशाकौर विद्या जर्नेलसिंग गौड हिने दहावीपासूनच 2017 पासून इंग्रजी भाषेतून आपल्या काव्यमय भावनांना व्यक्त करण्यास सुरूवात केली. इन्स्टाग्रामवरील एका पेजला फॉलो करताना दोन तीन स्पर्धामध्ये सहभाग घेतला असता एका कवितेला सर्वोत्तम पुरस्कारही मिळाला.रायटर्स प्लॅटफॉर्म पब्लीकेशन्स मार्फत सागरिका साहा आणि किर्ती मखिजा यांनी देशभरातील कवी आणि लघुकथा लेखकांचा प्रातिनिधिक भावना संग्रह प्रसिध्द करण्याचे ठरविले आणि अर्थातच दिलशाकौर गौड हिला कविता पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले. यापैकी दिलशाकौरच्या तीन कवितांचा समावेश राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोरियस सागा’ या पुस्तकामध्ये करण्यात आला.
या कविता व लघुकथांचा समावेश असलेल्या भावनासंग्रहामध्ये दिलशाकौर गौड हिच्यासह विकी तायडे, उन्नती वर्मा, आशुतोष आगरवाल, आयुष जैन, अर्जून श्रीवास्तव, आशिष बारडीया, गौरव दुबे, देवांशी मखिजा, देबाजित देव, भूपेंद्र रघुवंशी आदी सुमारे 40 नवोदित तसेच कसलेल्या जुन्या कवी, कवियत्री आणि लघुकथा लेखकांद्वारे कधीही न ऐकलेल्या भावनांची मांडणी करणाऱ्या या राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोरियस सागा’ या पुस्तकाची विक्री चक्क ऍमेझॉन या विक्री संकेतस्थळावरून सुरू झाली.
या पुस्तकातील दिलशाकौरच्या ‘हे युथ’ या कवितेतील सहजसुंदर सोप्या शब्दांच्या मांडणीतून तरूणांसाठी प्रेरणादायी विचार सर्वांनाच भावना असून ‘फॉलिंग इज ब्युटीफुल’ या कवितेतून दिलशाकौरने तर पडत्या काळातील सौंदर्य मांडून आत्मविश्वास वाढविण्याचा माध्यम बनविण्याचे केलेले आवाहन तसेच ‘मिस्टेक’ कवितेतील जर दुरूस्त करण्याचं सामर्थ्य अंगी असेल तर केलेली चुकही स्वागतार्ह आहे, असे विचार मांडले आहेत. या पुस्तकातील लघुकथा अन् कवितांमधील भावनांमुळेच या पुस्तकाला भावनासंग्रह म्हणण्यात आले आहे आणि या भावनासंग्रहामध्ये महाड येथील लढवय्या शिख जर्नेलसिंग गौड आणि फौजीआंबवडेतील विद्या पवार यांच्या संसारवेलीवरील दिलशाकौर या सुंदर हळुवार भावनाग्रही फुलाचा दरवळ विशेष जाणवत आहे. या कवितांचे कॉपीराईट प्रकाशन संस्थेने न मागितल्याने दिलशाकौर भविष्यात तिच्या सर्वच भावनाकाव्यांचा संग्रह प्रकाशित करण्याचा मानस बाळगून आहे.
Be First to Comment