मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प : मुंबईसह महानगर प्रदेशाला मिळणार अखंड वीज पुरवठा
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
मुंबई सोबतच लगतच्या उपनगरांचा झपाट्याने विकास होत आहे. अशावेळी अखंडित वीज पुरवठा ही काळाची आणि त्यासोबतच या परीसराचीही गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुंबई ऊर्जा मार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रगती पोर्टलच्या माध्यमातून स्वतः सदर प्रकल्पाच्या प्रगतीवर जातीने लक्ष देत आहेत.
गेल्या दशकभरात मुंबईसोबतच त्याच्या आसपासच्या महानगर परिसरामध्ये पायाभूत सुविधांचा अत्यंत वेगाने विकास होत आहे. परिणामी या भागामध्ये औद्योगिक आणि रहिवासी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड अशी वाढ झाल्याने विजेची मागणी वाढती असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढता वीज वापर लक्षात घेता अशावेळी अखंडित वीज उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखूनच केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयातर्फे मुंबई ऊर्जा मार्ग हा आंतरराज्य महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या काळात मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये अखंडीत वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.
मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून अखंड वीज पुरवठ्यासाठी एक आंतरराज्य ट्रान्समिशन नेटवर्कची (ISTS) उभारणी केली जात आहे. ज्यामुळे मुंबई आणि महानगर प्रदेशासाठी तब्बल २ हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासोबतच या भागासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वीज पुरवठ्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कलाही बळ देण्याचे काम या महत्वाकांक्षी प्रकल्पातून केले जाणार आहे.
मुंबई उर्जा मार्ग हा एक आंतर-राज्य पारेषण प्रणाली प्रकल्प आहे. यामध्ये पश्चिम क्षेत्र सबळीकरण योजना-XIX (WRSS-XIX) आणि उत्तर-पूर्व क्षेत्र सबळीकरण योजना-IX (NERSS-IX) अंतर्भूत आहेत.संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचा प्रकल्पामध्ये समेवश आहे. मुंबई उर्जा मार्ग पारेषण प्रकल्पांतर्गत मुंबई आणि महानगर प्रदेशात १०० किमी ट्रान्समिशन लाइन्सचे जाळे विणले जाणार आहे. ज्यामध्ये मुंबई आणि महानगर प्रदेशात २ हजार मेगावॅटहून अतिरिक्त वीज वाहून नेण्याची क्षमता असेल,तसेच संपूर्ण राज्यात वीज प्रवाह सक्षम करण्यासाठी अत्यंत आवश्यक ट्रान्समिशन कॉरिडॉरची स्थापना केली जाईल. त्यातही चोवीस तास परवडणारी आणि हरित उर्जा ही मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातून महाराष्ट्रासाठी उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी नक्कीच गेम चेंजर बनेल असा विश्वास या क्षेत्रातील निष्णात व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारतर्फे ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर पॉवर कॉरीडॉरचे जाळे उभारून वीज पुरवठ्याबाबत देशाला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रगती पोर्टलच्या माध्यमातून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा सातत्याने आढावा घेत आहेत,त्यावरूनच देशाच्या उज्वल भविष्यासाठी या प्रकल्पाचे महत्व अधोरेखित होत आहे. मुंबई आणि महानगर प्रदेशातील भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी आणि या परिसराच्या अखंड वीज पुरवठ्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे अत्यावश्यक बनले आहे.
Be First to Comment