वैभव पाटील यांचा ५० वा वाढदिवस दणक्यात साजरा : शेकडो चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सिटी बेल ∆ विशेष संपादकीय ∆
न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस तथा पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या ओबीसी सेलचे पनवेल तालुका अध्यक्ष वैभव चंद्रकांत पाटील यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी पेण तालुक्यातील कळवे गावी पोहोचलो. अडथळा रहित उत्कृष्ट आयोजनाचा मास्टर माईंड म्हणून वैभव पाटील यांची दखल घ्यावीच लागेल. कामगार चळवळीचे क्षेत्र असो किंवा राजकीय पटलावरील वैभव पाटील याची वाटचाल असो… इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांचं नाव घेतल्यानंतर सावलीप्रमाणे ज्याचं नाव तुमच्या आमच्या मनात उमटतं ते वैभव पाटील!
महेंद्र घरत हे नेहमीच त्यांच्या कामगार चळवळीबद्दल आणि NMGKS बद्दल भरभरून बोलत असतात. महेंद्र घरत ज्या ज्या अचिवमेंट,मैलाचा दगड म्हणून सांगत असतात त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे वैभव पाटील या व्यक्तीचे प्रचंड परिश्रम आणि अप्रतिम नियोजन असते. वास्तवात एखाद्याचे मूल्यमापन करताना त्याच्याकडे जमीन जुमला किती आहे,पैसा अडका किती आहे… सर्वसाधारणपणे हेच पाहिलं जातं. पण वैभव पाटील यांनी महेंद्र घरत आणि तमाम कामगार क्षेत्राचा विश्वास संपादन केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे ही श्रीमंती जगात अन्य कुठल्याही प्रकाराने तोलता येणार नाही.
साधारण एक तपापूर्वी ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये उडी मारली होती. मी त्यावेळी दैनिक कर्नाळाचे संपादन करत होतो. वैभव पाटील यांचे मार्गदर्शक असणारे महेंद्र घरत आणि माझ्यासाठी श्रद्धास्थान असणारे माजी आमदार विवेक पाटील या दोघांच्या मधून विस्तव जात नव्हता. प्रशांत ठाकूर यांनी भाजप जवळ केल्यानंतर अनाहूत पणाने शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मैत्री वाढली. आमच्या दोन्ही नेत्यांच्यामध्ये सुसंवाद सुरू झाला. अगदी तेव्हाच वैभव पाटील यांच्याशी ओळख झाली. गेल्या बारा वर्षात या ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत कधी झाले हे किंबहुना आम्हा दोघांनाही सांगता येणार नाही.
वैभव पाटील यांनी आज मिळवलेलं हे स्थान हे सुद्धा केवळ महेंद्र घरत यांच्याशी जवळीक आहे म्हणून मिळालेले नाही. वैभवने नोकरी सांभाळून संघटनेसाठी वेळ देत अक्षरशः दिवसातले 16- 16 तास काम केलेले आहे. कामगार क्षेत्र म्हणजे असंख्य तंटे बखेडे असे क्षेत्र. भांडवलदार नेहमीच अल्प मोबदला देऊन कामगार वर्ग राबविण्याचे स्वप्न पाहत असतो. अशा भांडवलदारांना पुरून उरताना मानसिक,शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि कणखर असावे लागते. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मुशीत तयार झालेला पट्टीचा पेहेलवान वैभव पाटील! आज या क्षेत्रात अधिकारवाणीने आपले स्थान निर्माण करतो आहे. त्याच्या उज्वल वाटचालीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी सिटीबेल वृत्तसमूहाकडून अनेक अनेक शुभाशीर्वाद.
Be First to Comment