Press "Enter" to skip to content

निवडणूक विश्लेषण

कर्नाटक निवडणूक : योग्य वेळी योग्य पर्यायाची निवड महत्वाची

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सुनियोजित पद्धतीने प्रचार करत बहुमत सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री पदी सिद्धरामैय्या यांनी शपथ घेतल्ये तर उपमुख्यमंत्री पदावर डी के शिवकुमार यांनी शपथ घेतली आहे. निवडणूक प्रचार प्रक्रिया राबविणे हि खरी तर एक कला आहे,म्हटले तर सायन्स सुद्धा आहे. निवडणूक ही राजकीय पक्षांची किंवा तुल्यबळ उमेदवारांची साटमारी असते.

निवडणुकीच्या रणसंग्रामात अनेक आयुधे उपलब्ध असतात.अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवजारे उपलब्ध असतात. जो योग्य वेळी योग्य आयुधाचा पर्याय निवडतो त्याचा विजय होतो.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उपलब्ध अनेक पर्याय उपलब्ध होते,कोणी योग्य पर्याय निवडलाय आणि कोणाची पर्याय निवड चुकली याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारांना आवडणारी पाच वचने देण्याचा काँग्रेस ने निवडलेला पर्याय मॅच विनर ठरला.

मध्यमवर्गीय,निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब अशा समाजच्या तिन्ही स्तरांनी या पर्यायाने स्वागत केले.काँग्रेस पक्षाने प्रचाराच्या माध्यमातून त्यांची भूमिका नागरिकांच्या पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राहुल गांधी,प्रियांका गांधी यांच्या समवेत पाच प्रमुख नेत्यांची वक्ते म्हणून निवड केली. तर भाजपा ने भाषणांची दारोमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच अवलंबून ठेवली.त्यामुळे २१ भाषणे आणि प्रचार फेऱ्या करून सुद्धा ६४ जागा मिळत असतील तर काँग्रेस ने योग्य पर्याय निवडला असेच म्हणावे लागेल.

निवडणुकांच्या प्रचार युद्धात प्रसिद्धी माध्यमांची योग्य निवड करणे हे खूप महत्वाचे असते.समाज माध्यमांवर योग्य कंटेन्ट पसरविणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे ठरते.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय वाहिन्यांच्यावर येत आपला प्रचार करत होते.

राष्ट्रीय परिसंवाद पातळीवर उजव्या विचारसरणीचे उदात्तीकरण करताना भाजपा ने रिपब्लिक टीव्ही चा पर्याय निवडताना विचार करायला हवा होता. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या सारख्या नेत्यांनी एखाद्या न्यूट्रल वृत्तसंस्थेवर त्यांचे विचार मांडण्याचा पर्याय निवडला असता तर तो जास्त परिमाणकारक ठरला असता. रिपब्लिक टीव्ही नेटवर्क त्रयस्थ माध्यम म्हणून प्रचलित नाही. या व्यतिरिक्त एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी आयोजित समिट मध्ये पंतप्रधानांचे अर्णब गोस्वामी यांनी केलेली कौतुक अतिशोयक्तीची सीमा गाठणारे होते.याच तुलनेत तत्पूर्वी इंडिया टुडे च्या कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधांनी केलेलं प्रबोधन खूपच संमर्पक आणि प्रगल्भ वाटले. त्याउलट "संपूर्ण मिडिया हाऊस तुमच्या विचारांना प्रसिद्धी देण्यास कटिबद्ध असेल" असे गोस्वामींनी सांगणे हे माध्यम नियमांच्या अधीन नाही. मतदारांना अशी अतिशयोक्ती आवडली नसावी. थोडक्यात काय ? तर राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी माध्यम निवडण्याचा पंतप्रधान महोदयांचा पर्याय चुकला.

महागाई आणि रोजगार निर्मितीमध्ये आलेले अपयश हे मुद्दे कळीचे करण्याचा काँग्रेस चा पर्याय निवडीचा निर्णय योग्य ठरला. याच महागाईच्या मुद्द्यावर कुठलाही प्रतिवाद भाजपा करू शकला नाही. जाहीरनाम्यामध्ये पाच महत्वाकांक्षी योजना निवडताना त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी याचा देखील काँग्रेस पक्षाने प्रचारात वापर केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत साऱ्यायोजना कधी कार्यान्वित करणार याचा देखील काँग्रेस पक्षाने जोरदार प्रचार केल्याने या योजना केवळ भुलविणाऱ्या न राहता वास्तवदर्शी ठरल्या. आक्रमक प्रचाराचा पर्याय अवलंबत डोअर टू डोअर प्रचार करण्याचा पर्याय देखील समर्पक ठरला. १९५०० करोड रुपयांचा टर्न ओव्हर असणाऱ्या कर्नाटक बेस नंदिनी दुग्ध उत्पादन संस्थेसमोर देश पातळीवर ५५ करोड रुपयांचा टर्न ओव्हर असणाऱ्या अमूल कंपनीला पाचारण करण्याचा भाजपा सत्ताधाऱ्यांचा निर्णय सुद्धा त्यांच्या विरोधात गेल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

एकूणच निवडणूक प्रचार आयुधांच्या पर्याय निवडीत काँग्रेस पक्ष सरस ठरला तर भाजपा चे पर्याय मात्र चुकीचे निवडले गेल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.