Press "Enter" to skip to content

भ्रष्टाचारी सरपंचाचा पाठीराखा कोण ?

लाच घेताना रंगेहाथ पकडलेले उसर्ली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच अतुल तांबे यांना निलंबित करूनही अद्याप अंमलबजावणी का नाही ?

सिटी बेल ∆ पनवेल ∆

पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द या ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल तांबे यांना लाचलुष्पक प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 फेब्रुवारी 2022 रोजी एका कंत्राट दाराकडून वीस हजाराची लाच घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या हे महाशय जामिनावर असून त्यांना निलंबित करण्याची कार्यवाही रायगड जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली होती.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या भ्रष्टाचारी सरपंचांना निलंबित करावे असा अभिप्राय विभागीय कोकण आयुक्तांना सादर केला होता. त्यानुसार विभागीय कोकण आयुक्तांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी पार पडली.

यानंतर विभागीय कोकण आयुक्त यांनी “महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) कलम ३९(१) अन्वये श्री. अतुल अनंता तांबे, सरपंच, ग्रामपंचायत उसर्ली खुर्द, ता. पनवेल, जि. रायगड यांना त्यांच्या सरपंच पदावरून काढून टाकण्यात येत आहे.” असे स्पष्ट आदेश 18 ऑक्टोंबर 2022 रोजी जारी केले आहेत.

विभागीय कोकण आयुक्तांच्या आदेशाला तब्बल पंधरा दिवस उलटले तरी अद्यापही या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत आहे. सदर भ्रष्टाचारी सरपंचाला वाचवण्यासाठी कोणती यंत्रणा तर कामाला लागली नाही ना ? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार हे भ्रष्टाचारी सरपंच महाशय थेट मंत्रालयात जाऊन मंत्रांकडून या निलंबनाच्या आदेशाला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत असे समजते म्हणुनचं या सरपंचांच्या निलंबन आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याची शंका उपस्थित होत आहे.

काय आहे हे प्रकरण…

पनवेल तालुक्यातील उसर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंता तांबे याने पनवेल येथील मौजे डेरवली मातोश्री सोसायटी समोरील रस्ता तसेच मौजे डेरवली बस थांबा ते साई निकेतन पर्यतचा रस्ता कॉन्केटिकरण करण्याचे विकास कामाचे मुल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्याकरीता कॉन्ट्रक्टर यांच्या कडे लाचेची मागणी केली होती.
ही तक्रार कॉन्ट्रक्टर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार या लाचखोर सरपंचाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. यावेळी सरपंच अतुल तांबे याने २५०००/- रूपयांची लाच मागितली असता कॉन्ट्रक्टर यांनी २००००/- रूपये देण्याचे कबूल केले. त्यानंतर विचुंबे गाव, नविन पनवेल, याठिकाणी रू. २०,०००/- लाचेची रक्कम स्विकारताना सरपंच अतुल तांबे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही आहे सरपंच अतुल तांबे यांच्या निलंबन आदेशाची प्रत 👇

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.