क्रीडा गणवेशामुळे हरवलेल्या मुलाचा शोध : रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचा क्रीडा गणवेश महत्त्वाचा ठरला दुवा
सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •
खारघरमधील गरीब कुटुंबातील १० वर्षीय मुलाला त्याच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून देण्यासाठी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचा क्रीडा गणवेश महत्त्वाचा दुवा ठरला आहे. मानसिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या ‘सोवित’ नामक या मुलाने सोमवारी परराज्यातील ट्रेनमध्ये चढून मध्यप्रदेशात ५८० किमी प्रवास केला. युनिफॉर्म व्यतिरिक्त, प्रवाशाची सतर्कता आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी यांचा तडफदारपणा यामुळे “मानसिकदृष्ट्या अस्थिर” मुलाला ओळखण्यास आणि त्याच्या पालकाकडे सुखरूप सुपूर्द करण्यात महत्वाची मदत झाली.
दरम्यान सोमवारी वाराणसीला जाताना अरविंद पाठक या प्रवाशाला, रेल्वे कल्याणमधून पुढे रवाना झाल्यानंतर एक मुलगा पीटी युनिफॉर्म परिधान केलेला निदर्शनास आला. तो खेळकर होता. “परंतु अनस्कॉर्ट केलेल्या मुलाला तो कोठे जात होता किंवा तो ट्रेनमध्ये का आला होता याचा काहीच पत्ता त्याला नव्हता, त्याच्याकडे सतत चौकशी केल्यानंतरही त्याला आपल्या आई-वडिलांचे एकेरी नाव व्यतिरिक्त कोणतीच माहिती देता येत नव्हती. फक्त “पेठगाव” असा तो उल्लेख करत होता. दरम्यान त्या मुलाने परिधान केलेल्या शाळेच्या क्रीडा गणवेशावर शाळेचे नाव असल्याने पाठक यांनी त्याला धीर दिला.
पाठक यांनी गणवेशावरील शाळेचा नाव गुगलमध्ये सर्च केला आणि संपर्क क्रमांक मिळविला. पण त्यावेळी रात्रीचे ९ वाजले होते, खूप उशीर झाल्यामुळे लँडलाइनकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा पाठक यांना नव्हती. मात्र संपर्क केला असता त्यावेळी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी यांनी फोन उचलला. त्या शालेय कामकाज निमित्त विद्यालयात काम करत होत्या. त्यावेळी खुद्द प्राचार्यानी लँडलाईन फोन उचलल्याने पाठक यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी सर्व हकीगत राज अलोनी यांना सांगितली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी राज अलोनी यांच्या डोळ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया होती. मात्र त्याचा कोणताही विचार न करता राज अलोनी यांनी सर्व कामे बाजूला सारून एका मिशन सारखे काम हाती घेतले. आणि यावेळी फोन नंबर्सची देवाणघेवाण झाली, त्यानंतर मुलाचा फोटो पाठविण्यात आला तसेच त्याच्या क्रीडा गणवेशावर ‘बस मार्ग ५’ असा टॅग होता तो अधोरेखित करण्यात आला होता. त्यानुसार प्राचार्य राज अलोनी यांनी मिशन प्रमाणे यावर काम करायला सुरुवात केली. त्यांनी मार्ग क्रमांक ५ वरील स्कूल बसच्या चालकाशी संपर्क साधला पण ड्रायव्हरला मुलाचा चेहरा ओळखीचा असल्याची खात्री नव्हती. मुलाचे फोटो शाळेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले. एकाही शिक्षकाला त्याची ओळख पटली नाही. तरीही, ऑनलाइन शालेय शिक्षणाच्या काळातील एक शंका निर्माण झाली होती, त्यामुळे राज अलोनी यांनी शाळेतील विद्यार्थी असण्याची शक्यता नाकारली नाही, जी कदाचित या कोरोना काळामुळे बस चालक किंवा शिक्षकांना ओळखत नसेल. शेवटी पाठक यांच्या भ्रमणध्वनीवर मुलाशी बोलले असता, त्या मुलाला शाळेबद्दल काहीच माहिती नसल्याचे समजले. या सर्व प्रक्रियेत हा मुलगा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचा विद्यार्थी नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तरीही प्राचार्यांनी सर्व काम बाजूला ठेवून त्याचा पाठपुरावा केला. दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सदरचे वृत्त कळताच त्यांनी पेठ गावातील भाजप कार्यकर्ते प्रभाकर जोशी यांच्याशी संपर्क साधून पेठ गावात पालकांचा शोध घेण्यासाठी सांगितले होते.
राज अलोनी यांनी भुसावळ येथील रेल्वे कर्मचार्यांशी समन्वय साधला, मात्र तोपर्यंत ट्रेन स्टेशनवरून निघून गेली होती. त्यानंतर त्यांनी खारघर पोलिस ठाण्याच्या संपर्कात येऊन मुलाचे फोटो शेअर केले. वरिष्ठ निरीक्षक जीतू म्हात्रे यांनी रेल्वे पोलिसांशी समन्वय साधला. खांडवा स्थानकावर मंगळवारी पहाटे ट्रेन थांबवण्यात आली, तिथे रेल्वे पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आणि तसा संदेश खांडवा येथील भाजप कार्यकर्त्याकडून आला. तोपर्यंत, रेल्वे प्रवाशांनी हरवलेल्या मुलाकडे लक्ष दिले, त्याला अन्न आणि पाणी दिले. या सर्व प्रकारात मुलाच्या पालकांनी खारघर येथे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या मुलाचे पालक घरकाम करून उदरनिर्वाह करीत आहेत, ज्या ठिकाणी हे काम करीत होते. तेथील मालकाने आपल्या मुलांचे जुने कपडे त्यांच्या कामगारांना दिले होते. त्यातील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचा क्रीडा गणवेश घालून सोमवारी सकाळी सोवित खारघर येथून जवळच्या पेठगाव येथे आजीकडे गेला होता, मात्र दुपारपर्यंत तो परतला नाही. मुलाची मानसिक अस्थिरता असल्याचे आईने सांगितले होते. प्राचार्य राज अलोनी यांचा या संदर्भातील पाठपुरावा तसेच अरविंद पाठक यांची समयसूचकता आणि शालेय क्रीडा गणवेश १० वर्षीय मुलाला त्याच्या पालकांना परत मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरली असून त्याला घरी परत आणण्यासाठी त्याचे आई-वडील रेल्वेने खांडवा येथे रवाना झाले असून “मानसिकदृष्ट्या अस्थिर” असलेल्या या मुलाच्या अंगात क्रीडा गणवेश नसता तर कदाचित या मुलाचा शोध घेणे कठीण झाले असते हे नक्कीच. या मुलाला मिशन प्रमाणे शोधण्यात महत्वाची कामगिरी बजावल्याबद्दल प्राचार्या राज अलोनी, प्रवासी अरविंद पाठक तसेच पोलिसांचे सोशल मीडियावर आभार व्यक्त केले जात आहेत.
Be First to Comment