Press "Enter" to skip to content

पनवेल पत्रकार मंचाचा शिर्डी-शिंगणापूर अभ्यास दौरा संपन्न

अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ओळखपत्र वाटप

पनवेल /वार्ताहर

        पनवेल तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणून सुपरिचित असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची नवनिर्वाचित वार्षिक कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. मंचाच्या परंपरेनुसार नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शिंगणापूर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.१३ व १४ मार्च रोजी संपन्न झालेल्या दौऱ्यामध्ये सदस्यांना कीटचे आणि ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. 
      विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे माध्यमातून वंचित, दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार विकास मंच सातत्याने कार्यान्वित राहिलेला आहे. मंचातील सर्व सदस्यांना पदाधिकारी म्हणून कार्य करता यावे याकरता पनवेल तालुका पत्रकार विकास मंचामध्ये नामनिर्देशनाद्वारे एकमताने वार्षिक कार्यकारणी निवड केली जाते. नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व सदस्य वर्षाची सुरुवात शिर्डी शिंगणापूर येथे श्री साईबाबा तसेच श्री शनेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन करत असतात.
        यंदाच्या अभ्यास दौऱ्यात राहुरी येथे प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे उद्भवलेला राजकीय पेच प्रसंग, द्राक्षाची नवीन संकरित जात, बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्र्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी अनोख्या पद्धतीने बनवलेला मानेचा पट्टा अशा विषयांवर सखोल अध्ययन करण्यात आले. विशेष लक्षणीय म्हणजे कोपरगाव येथील प्रवीण पाटील व प्रसाद पाटील संचलित काव्या येवले पैठणी या भव्य शोरूम च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातील पदाधिकारी सल्लागार व सदस्यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी काव्या येवले पैठणी येथे मंचातील सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. 
       शिर्डी येथील भव्य ऑडिटोरियम मध्ये अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तमाम सदस्यांना ओळखपत्रे, गाडीवर लावायचे स्टिकर्स आणि वार्षिक किटचे वाटप केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राजेंद्र पाटील म्हणाले की पनवेल तालुका पत्रकार मंचातील प्रत्येक कार्यक्रम हा अनोखा आणि जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित केलेला असतो. असेच जनता केंद्रित कार्यक्रम राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे, सरचिटणीस हरेश साठे, उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, खजिनदार दत्ता कुलकर्णी, उपसचिव राजू गाडे,सदस्य लालचंद यादव यांची उपस्थिती होती. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अभ्यास दौऱ्यात सहभागी होता येत नसले तरी देखील अभ्यास दौऱ्यावर जाणाऱ्या सदस्यांना सी ऑफ करण्यासाठी प्रवीण मोहोकर व भरत कुमार कांबळे हे आवर्जून हजर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.