आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने प्रभुदास भोईर यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची भेट
सिटी बेल ∆ मुंबई ∆
शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे राज्य प्रमुख प्रभुदास अर्जुन भोईर उर्फ अण्णा यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
याबाबत अधिक माहिती देताना प्रभुदास भोईर म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ घडवून आणणारा अजित दादांचा निर्णय समजल्यानंतर मी मोजक्या कार्यकर्त्यांसह तातडीने मुंबईला त्यांच्या भेटीस गेलो. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री महोदया आदिती ताई तटकरे, माजी सहकार मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन आगामी राजकीय घडामोडींबाबत चर्चा केली. यावेळी प्रभुदास भोईर यांच्या समावेत महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बोरकर उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना प्रभुदास भोईर म्हणाले की राजकारण हा माझा पिंड नाही. वाहतूकदार आणि कामगार यांच्या न्याय हक्कासाठी लढणं एवढेच मला समजतं. राज्यातील राजकीय परिस्थिती निश्चितच माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना संभ्रमावस्थेत टाकणारी आहे. परंतु माझी वैचारिक बैठक अत्यंत सक्षम आहे तसेच समाजकारण करत असताना माझी ध्येय निश्चिती झालेली आहे. म्हणूनच मी घेतलेल्या राजकीय भेटीगाठींचा कुठलाही अन्वयार्थ न लावता ती केवळ आणि केवळ अभिनंदन करण्यासाठी घेतलेली भेट होती.
Be First to Comment