Press "Enter" to skip to content

एका “वादळाची” वर्षपूर्ती

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचा एकवर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण

सिटी बेल ∆ विशेष लेख ∆ विवेक पाटील, समूह संपादक

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष पदाची धुरा यशस्वी आणि प्रभावीपणे सांभाळल्याला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त हा विशेष लेख !

एक वर्षापूर्वी महेंद्र घरत यांनी पदभार स्वीकारला तो क्षण..

कोकण चे भाग्यविधाते स्व.बॅरिस्टर एक.आर. अंतुले यांच्या नंतर रायगड मध्ये कॉंग्रेस पक्षाची बिकट अवस्था झाली होती. त्यातच तात्कालीन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप, माजी आमदार मधुकरशेठ ठाकूर, श्याम म्हात्रे यांच्या सारख्या नेत्यांच्या अचानक जाण्यामुळे पक्षाची अवस्था अधिकच गंभीर झाली. अश्या विपरित परिस्थितीत रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाची धुरा कामगार नेते महेंद्र घरत यांच्याकडे आली.

ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हापरिषद ते इंटक चे राष्ट्रीय सचिव तसेच आयटीएफ च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या महेंद्र घरत यांनी या संधीचे सोने केले. महेंद्र घरत यांनी सर्व प्रथम तळागळापर्यंतच्या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास निर्माण करून आशा पल्लवीत केल्या. रायगड जिल्हा कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना आज कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे. हे करताना घरत यांनी तन मन धन पूर्णपणे समर्पित केले. रोखठोक बोलणे या त्यांच्या स्वभावामुळे पक्षासाठी झटून काम करणारे कार्यकर्ते त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. काल परवापर्यंत फक्त पक्षाला मतदान करण्यापुरते घराबाहेर पडणारे काॅंग्रेस कार्यकर्ते आज घराबाहेर पडून कामाला लागले आहेत ते फक्त महेंद्र घरत यांचे झंझावाती काम पाहूनचं.

विविध प्रकारचे आंदोलन, धरणे, मोर्चे, रॅली, मळावे, पक्षप्रवेश आणि बैठका घेऊन पक्षाचा आवाज रायगड जिल्ह्यात महेंद्र घरत यांनी बुलंद केला. रायगड जिल्ह्यात काॅंग्रेसला कमी लेखणाऱ्या विरोधकांबरोबरचं आघाडीतील घटक पक्षांना देखील आता काँग्रेसला मानाचे स्थान देणे भाग पडले आहे.

महेंद्र घरत यांच्या सततच्या व्यस्त कार्यक्रमामुळे कॉंग्रेस पक्षाला सुगीचे दिवस आल्याची चर्चा जनमानसात दिसून येते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ग्रामपंचायत स्तरापासून झपाट्याने वाढत आहे. आज मीतिला रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नसला तरी महेंद्र घरात यांच्या राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या ओळखीमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची कोणतीही कामे मंत्रालयातून करून आणण्यात महेंद्र घरात यशस्वी झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांची अथवा कार्यकर्त्यांची सरकारी पातळीवरील कामे असो किंवा पोलीस ठाण्यातील कामे असो त्याचबरोबर शेकडो तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असो असे अनेक प्रश्न महेंद्र घरात यांनी चुटकी सारखे सोडवले आहेत. महेंद्र घरत यांच्या रूपाने रायगड जिल्हा काँग्रेसला एक खंबीर तसेच कार्यक्षम नेतृत्व मिळाले आहे यात कोणालाच दुमत असण्याचे कारण नाही. यापुढेही त्यांचेही यशस्वी घोडदौड कायम राहील या शंका नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.