लॉकडाउन लागणार, आरोग्यमंत्र्यांची स्पष्ट घोषणा
सिटी बेल | मुंबई |
देशासह राज्य आणि शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मात्र, तुलनेने मागील काही दिवसांपासून ही रुग्णसंख्या काहीशी स्थिरावताना दिसतेय. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना स्थिती पुन्हा एकदा नव्याने आढावा घेतलाय. या आढाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेउन राज्यातल्या कोरोना स्थितीची माहिती दिलीय. या पत्रकार परिषदेत त्यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. शिवाय, राज्यात कोणत्या दिवशी लॉकडाऊन लागणार, याबाबतची माहिती त्यांनी दिलीय.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
पत्रकार परिषदेत राज्यातील लसीकरणासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली. “लसीकरण दर कमी होताना दिसत आहे. दररोज 6 लाख 50 हजार लोकांचं लसीकरण होतंय. तर कमाल 8 लाख लोकांना लस मिळतेय. दरम्यान, लसीकरणाला वेग दिला आहे, असंही आरोग्यमंत्र्यानी म्हटलंय.
लॉकडाऊन केव्हा लागणार ?
“राज्यात सध्या ऑक्सिजनची मागणी ४०० मेट्रीक टन इतकी आहे. यापैकी 250 नॉन कोविड आणि 150 मेट्रीक टन कोविड रुग्णांसाठी लागत आहे. हीच ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनवर गेली, की त्यादिवशीच आपण लॉकडाऊन लावणार आहोत” असं टोपेंनी ठणकावून सांगितलंय.
राज्यातील लस घेणाऱ्यांची टक्केवारी
“राज्यात आतापर्यंत 67 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, 90 टक्के लोक असेही आहेत ज्यांनी लसीचा फक्त पहिला डोस घेतला आहे. याशिवाय, 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाखालील वयोगटातील 35 टक्के मुलाचं लसीकरण झालंय”, अशी माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लसींचा तुडवडा
सध्या राज्यात कोव्हॅक्सीन अणि कोविशिल्ड लस कमी पडत आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून मागणी केली जाणार आहे. कोव्हॅक्सिन आपण लहान मुलांना देतोय, त्याची मागणी जास्त आहे. आपल्याला सध्या कोव्हॅक्सिनच्या ६० लाख तर कोविशिल्डच्या ४० लाख लसींची गरज असल्याचं टोपेंनी सांगितलं.
शाळांबाबतचा निर्णय काय ?
शाळांबाबत मंत्रीमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शाळा अजून 15 ते 20 दिवस बंदच ठेवाव्या असं ठरलं आहे. त्यानंतर आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Be First to Comment