Press "Enter" to skip to content

नवी मुंबई सीजीएसटीने दोन व्यावसायिकांना केली अटक

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून कोट्यावधी रुपयांची सीजीएसटीची लुट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश 

सिटी बेल | पनवेल |

वस्तू किंवा मालाचा पुरवठा न करता ३८५ कोटींहून अधिक रुपयांच्या बोगस पावत्या तयार करुन त्याद्वारे ७० कोटी रुपयांच्या वस्तु व सेवा कराचा समावेश असलेल्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे.

या रॅकेटमध्ये १४ पेक्षा अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश असल्याचे तसेच या रॅकेटचे जाळे मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये पसरल्याचे तपासात आढळुन आले आहे. या कारवाईत सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी दोन व्यावसायिकांना अटक केली असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर कंपन्याच्या चालक मालकांचा आता शोध घेण्यात येत आहे.  

काही कंपन्यांकडून बोगस पावत्याद्वारे वस्तु व सेवा कराचा समावेश असलेले बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून कोट्यावधी रुपयांची सीजीएसटीची लुट करण्यात येत असल्याची माहिती सीजीएसटीच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाकडून नवी मुंबई सीजीएसटीला देण्यात आली होती.

सदर माहितीच्या आधारे नवी मुंबई सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी गत शनिवारी तपासणी केली असता, मेसर्स ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज लि. व मेसर्स  बिटू मॅक्स ट्रेडिंग या दोन कंपन्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून बिटुमेन, ऍस्फाल्ट, ऑइल शेल आणि टार सँड यासारख्या वस्तुंची खरेदी- विक्री  करत असल्याचे बोगस पावतीद्वारे दाखविल्याचे आढळुन आले. तसेच त्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे तसेच इतर १२ कंपन्यांनी देखील ३८ कोटी रुपयांच्या बनावट आयटीसीचा लाभ घेतल्याचे तपासात आढळून आले.

त्यानुसार सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी मेसर्स ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचा संचालक व व मेसर्स श्री बिटुमॅक्स ट्रेडिंगचा मालक या दोघांना सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत कलम १३२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे.  

 सीजीएसटी मुंबई विभागाने कर चुकवेगिरी विरोधात विशेष मोहीम सुरु केली असून या विशेष मोहिमेत प्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या गटाकडून डेटा अनॅलिटीक्स आणि नेटवर्क विश्लेषण साधनांच्या माध्यमातून बनावट आयटीसी नेटवर्क आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मागील चार महिन्यांपासून सुरु असलेल्या या विशेष मोहिमेत ५०० पेक्षा अधिक करचुकवेगिरी करणारे सापडले असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन त्यातील ४० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ४५५० कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली असून करचुकवेगीरी करणाऱ्यांकडून ६०० कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.

फसवणूक करणाऱ्या तसेच करचुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील मोहीम यापुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार  असल्याचे मुंबई विभागाच्या सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजीव गर्ग यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.