गुजरातमधील सर्वोच्च शिखर गिरनार वर फडकला महाराष्ट्राचा झेंडा,रायगडातील चार वर्षाच्या चिमुकलीची अद्भुत कामगिरी
दहा हजार पायऱ्यांचे गुजरातमधील सर्वोच्च गिरनार शिखर सर…सलग चौथ्या विक्रमांसह अकराव्या रेकॉर्डस बुक मध्ये नोंद
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
जागतिक विक्रमवीर, बालगिर्यारोहक कु. शर्विका जितेन म्हात्रे हिने हिने सलग चौथा विश्वविक्रम नोंदवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, महाराष्ट्रातील कठीण सुळका(कलावंतीण) आरोहण असेल,महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला (साल्हेर) असेल अथवा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर(कळसुबाई) असेल ह्या तिच्या गाजलेल्या मोहिमांनंतर तिने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची झलक दाखवून चौथ्या विक्रमांसोबत सलग अकराव्या रेकॉर्डस् बुक मध्ये आपले नाव नोंदविले आहे,
कोजागिरी पौर्णिमा आणि हिरकणीचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन तिने ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी गुजरात मधील सर्वोच्च शिखर गिरनार सर करून एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला आहे.
समुद्र सपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर वसलेल्या गिरनारच्या गुरुशिखर ह्या सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी पायथ्यापासून सुमारे १०,०००(दहा हजार) पायऱ्यांचा टप्पा पार करावा लागतो, घरापासून सुमारे ८५० किलोमीटरचे अंतर,१७ तासांचा प्रवास,रात्रीचा जंगल प्रवास, पहाटेची बोचरी थंडी, ह्या सर्व अडथळ्यांवर मात करत शर्विकाने सुमारे साडे पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर गुजरात मधील सर्वोच्च शिखर गिरनार वर महाराष्ट्राचा स्वराज्य ध्वज आणि भारताचा राष्ट्र ध्वज फडकावला आहे, एवढे उंच शिखर चढून जाणारी शर्विका ही भारतातील सर्वात पहिली, सर्वात लहान कन्या ठरली आहे, तिच्या ह्या कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा गुजरातसह भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे,
आपल्या बारा जणांच्या टीमसह शर्विकाने दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ च्या रात्री १०.३० वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात केली, आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे ४ वाजता गिरनार शिखरावर राष्ट्र ध्वज आणि स्वराज्याची भगवी पताका फडकावली.
तिच्या ह्या कामगिरीमुळे गिर्यारोहण क्षेत्रात पुन्हा एकदा सर्वात लहान वयात तिने आपले नाव अधोरेखित केले आहे, आपला दैदिप्यमान प्रवास संपवून ती महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मायभूमीत राहत्या घरी दाखल होणार आहे, रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तिचे कौतुक होत आहे.
Be First to Comment