“लाॅकडाऊन” ची फालतुगीरी
“मी सुधाकर देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका हद्दीत दिनांक ०३/०७/२०२० रोजी सायंकाळी ९.०० ते दिनांक १४/०७/२०२० रोजी सकाळी ५.०० वाजेपर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी दिनांक २४/०७/२०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे”
हा लेखी आदेश पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नुकताच जाहीर केला आहे. परंतु पुन्हा एकदा लॉकडाउन करताना येथील नागरिकांचा थोडातरी विचार करण्यात आला आहे का ? हाच यक्षप्रश्न आहे !
याआधीही महानगरपालिकेने गेले दहा दिवस कडक निर्बंध घालून लाॅकडाऊन केले परंतु त्याचा काय उपयोग झाला ? या लॉकडाउनच्या आधी रोज जितके रुग्ण सापडत होते त्याहून दुप्पट रुग्ण गेल्या दहा दिवसात रोज सापडत आहेत. मग या लाॅकडाऊन चा काय उपयोग झाला ? असा प्रश्न सर्वसामान्य पनवेल करांना पडला आहे.
या प्रश्नांची उत्तरे मिळायलाचं हवीत
1) पुन्हा एकदा लॉक डाऊन केल्यानंतर गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने कोण कोणत्या विभागात जंतुनाशक फवारणी केली ?
2) गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने स्वतःहून यंत्रणा राबवून नागरिकांची आरोग्य तपासणी केली का ?
3) गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी कोणते प्रयत्न केले ?
एकंदरीत महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्या बाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. फक्त जे कोरोना रुग्ण सापडले आहेत त्यांना क्वारंटाइन करणे किंवा रुग्णालयात दाखल करणे एवढेच काम केले. त्यातही अनेक गौडबंगाल आहे त्याचा समाचार पुढच्या फोडणीत घेऊ.
बरं आता नवीन आदेशानुसार काही प्रमाणात सूट दिली आहे असे म्हणतात खरे ! परंतु प्रत्यक्षात ही सूट फक्त कागदोपत्री दिखावा आहे. कारण किराणा मालाच्या दुकानांना घरपोच विक्री करण्यास परवानगी दिली आहे. माञ आज मितीला किती किराणा दुकाने घरपोच सेवा देत आहेत त्याचा तपशील महानगरपालिका जाहीर करू शकली नाही. शहरातील रिक्षा सेवा बंद केली आहे परंतु जर कोणाला अचानक ताप भरला किंवा इतर आजार झाला आणि त्याच्याकडे स्वतःचे वाहन नसेल तर त्याने दवाखान्यापर्यंत पोहोचायचे कसे ? हा देखील प्रश्नच आहे. या लाॅकडाऊनमुळे अनेक छोटे छोटे उद्योग करणारे घरी बसले आहेत. त्यांचे पोट हातावरचे आहे त्यांचे काय होणार ? त्यांचा भूकबळी या शासनकर्त्यांना घ्यायचा आहे का ? हाच प्रश्न आहे ! चला.. केला परत लॉकडाऊन पण तुम्ही खाञीने सांगाल का ? येत्या दहा दिवसात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात येईल.
आता पुन्हा वाढलेल्या या लाॅकडाऊनमुळे लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होऊ लागला आहे. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती हा लोकांचा लढा लढणार आहे. आता इतक्या महिन्यानंतर लोकांनाही कळून चुकले आहे की आपण विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच सोशल डिस्टंसिंग ठेवायलाचं हवे ! त्यामुळे लोकं स्वतःची काळजी स्वतः घेत आहेत. लाॅकडाऊन मध्ये सूट दिल्यास जर सोशल डिस्टंसिंग पाळले जात नसेल तर संबंधित दुकानदारांवर किंवा नागरिकांवर कारवाई करण्याचा पर्याय तर खुला आहेच. हवे तर ही कारवाई आणखी कडक करा. मग तो पर्याय वापरा ना ! घरात बसून होणारे खर्च तर थांबत नाहीत. लाईटचे बिल सुरूच आहे, मुलांच्या शाळांची फी भरावी लागणारचं आहे, बँकेचे हप्ते आज नाहीतर उद्या भरायचे आहेतचं, अरे मग जी सुरुवात उद्यापासून करणार आहोत ती आजच का करु नये ? देशाच्या पंतप्रधानांनी देखील हे मान्य केले आहे की आता आपल्याला कोरोना सोबत जगायचं आहे ! मग आपण पंतप्रधानांच्या शब्दाला तरी किंमत द्यावी हीच शेवटची नम्रतेची विनंती !
विवेक मोरेश्वर पाटील, समुह संपादक सिटी बेल लाइव्ह
Be First to Comment