मुंबई – गोवा प्रवास होणार दोन तासांनी कमी
सिटी बेल ∆ मुंबई ∆
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्या टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनासह चालवल्या जाणार आहेत. त्यापैकी कोकणकन्या एक्प्रेस आजपासून विद्युत इंजिनसह धावू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने या गाडीबाबतची नवी घोषणा केली आहे. नव्या बदलामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसच्या एकूण प्रवासात दोन तास दहा मिनिटांची बचत होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापासूनची तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांना 10111/10112 या जुन्या क्रमांकाऐवजी 20111/20112 या नव्या क्रमांकानुसार तिकीट काढावे लागणार आहे.
कोकणकन्या झाली सुपरफास्ट
कोकणकन्या सुपरफास्ट एक्स्प्रेस येत्या २० जानेवारीपासून मडगाव येथून सायंकाळी ४.५० ऐवजी सात वाजता सुटणार आहे. ती सावंतवाडीला रात्री आठ वाजून ३६ मिनिटांनी, कुडाळला रात्री ८.५८ वाजता, कणकवलीला रात्री नऊ वाजून २८ मिनिटांनी, राजापूरला १० वाजून १४ मिनिटांनी, रत्नागिरी स्थानकावर रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी, चिपळूणला मध्यरात्री नंतर एक वाजून २८ मिनिटांनी तर खेडला ती रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. मुंबईत सीएसएमटी स्थानकावर ती नेहमीप्रमाणे पाच वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.
मुंबई सीएसएमटीहून मडगावकडे येताना सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस आधीप्रमाणेच रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. खेड स्थानकावर ती आधीच्या पहाटे तीन वीस ऐवजी तीन वाजून चार मिनिटांनी येईल. चिपळूणला आधी ३.५८ ऐवजी तीन वाजून ३० मिनिटांनी येईल. संगमेश्वरला ती पहाटे चार वाजून ३८ मिनिटांनी यायची. आता ती चार वाजून दोन मिनिटांनी येईल. रत्नागिरी स्थानकावर पूर्वीच्या पाच वाजून २५ मिनिटांऐवजी चार वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. कणकवलीला सहा वाजून ४२ मिनिटांनी, कुडाळ ७ वाजून १२ मिनिटांनी, तर सावंतवाडीला ७ वाजून ३२ मिनिटांनी पोहचेल. पूर्वी ही गाडी मडगावला दुपारी बारा वाजून १० मिनिटांनी पोहोचत असे. आता ती ती सकाळी पावणेदहा वाजता पोहोचणार आहे.
Be First to Comment