Press "Enter" to skip to content

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मोठ्या जल्लोषात कोकण शिक्षक मतदारसंघासाठी बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सिटी बेल ∆ सिबीडी ∆ प्रतिनिधी ∆

महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार, आमदार बाळाराम पाटील यांनी मोठ्या जल्लोषात कोकण विभागीय आयुक्त कार्यालय बेलापूर यांच्या कार्यालयात आज दिनांक 11जानेवारी 2022रोजी सकाळी 12.20 वाजता आपला निवडणूक अर्ज दाखल केला.

यावेळी बाळाराम पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाध्यक्ष शिरीष घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बाळाराम पाटील यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर बेलापूर येथील जयंतीलाल मेहता सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी वरील मान्यवरांव्यतिरिक्त शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, खासदार राजन विचारे, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, इत्यादींसह काँग्रेसचे नेते आर. सी. घरत, शेकापचे नेते जे. एम. म्हात्रे, नारायण घरत, जी. आर. पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, महाविकास आघाडीचे समन्वयक काशिनाथ पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भानुदास तुरुकमाने, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, गणेश कडू इत्यादी मान्यवर आणि रायगड पनवेल मधील शिक्षक मोठया प्रमाणावर उपस्थित होते. या मध्ये महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आमदार बाळाराम पाटील यांनी त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये शिक्षकांच्या विविध प्रश्नांची तड लावली आहे. असा शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा आमदार पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून जाणे गरजेचे आहे. सध्या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत जे चुकीचे धोरण शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्या धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी बाळाराम पाटील यांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे मत देऊन पहिल्याच फेरीत विजयी करू या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनीही बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करताना सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली ते म्हणाले की, सध्याचे सरकार हे केवळ शिक्षकांना देशोधडीला लावण्यासाठीच सत्तेवर आलं आहे, त्यामुळे अशा सरकारला नजीकच्या भविष्यकाळात जागा दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी कंबर कसावी व बाळाराम पाटील यांना मोठ्या फरकाने विजयी करावे, असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बाळाराम पाटील यांनी त्यांच्या आज पर्यंतच्या आमदारकीच्या काळात शिक्षकांसाठी केलेल्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा बाळाराम पाटील यांना का उमेदवारी द्यावी हे सिद्ध केलं आहे. खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाची शिकवण अमलात आणताना शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना आमलात आणावी, त्याचबरोबर सर्व शाळा अनुदानित तत्त्वाने चालवण्यात याव्यात यासाठी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये लढा देणाऱ्या बाळाराम पाटील यांनी प्रसंगी रस्त्यावर उतरून शिक्षकांच्या प्रश्नांच्या बाबतीत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. अशा उमेदवाराला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजयी करून शिक्षकांचा प्रतिनिधित्व करण्यासाठी विधिमंडळात पाठवावं, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानताना आमदार बाळाराम पाटील यांनी शिक्षकांच्या सर्वच समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानताना त्यांच्यामुळेच आपल्याला शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, असं प्रतिपादन केलं.

ते पुढे म्हणाले की, मागील निवडणुकीत माझ्या विजयासाठी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलं संपूर्ण समर्पण दिलं, तसंच ते यावेळीही देतील, असा मला विश्वास आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संसदेच्या वतीने अध्यक्ष अशोक बहिरव यांच्या हस्ते आमदार बाळाराम पाटील यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आलं.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.