Press "Enter" to skip to content

सुदाम पाटील स्वगृही परत

२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल : नाना पटोले

इंटक व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामुळे पनवेल काँग्रेसला नवी ऊर्जा

सिटी बेल ∆ पनवेल ∆ साहिल रेळेकर ∆         

२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल. कारण काँग्रेस सत्तेत आली पाहिजे ही जनभावना आहे. ते करण्याचे काम मी करतोय. मुख्यमंत्री कोणाला करायचे हे आमचे हाय कमांड ठरवतील. काँग्रेसला सत्तेत आणणे हे माझे दायित्व आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून देशाचे संविधान संपवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम सुरू आहे. कामगारांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. यासाठी देशाला कॉंग्रेसची गरज आहे. तसेच कामगारांना न्याय देण्यासाठी इंटकची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते आज (शुक्रवार दि.६ जानेवारी) पनवेलमध्ये इंटकचे अधिवेशन व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यादरम्यान बोलत होते.         

मेळाव्यात कामगारांचे विविध प्रश्न आणि ठराव मांडण्यात आले. यावेळी नाना पटोले यांनी सरकार कशा पद्धतीने कामगारांवर अन्याय करीत आहे हे सांगताना सरकारवर सडकून टीका केली. भाजप ईडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही. मुंबई महापालिकेसह इतरही महापालिका निवडणुकांच्या घोषणा होऊनही अजून निवडणुका घेतल्या जात नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, कारण निवडणुकांना भाजप घाबरलेली आहे. लोकांच्या मनात भाजप विरोधात राग आहे. महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ असे अनेक प्रश्न भेडसावतायत.           

याप्रसंगी इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, राष्ट्रीय इंटक उपाध्यक्ष आर पी भटनागर, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, सुनील शिंदे, विनोद पटोले, भाग्यश्री भुर्के, दिवाकर दळवी, डॉ.भक्तीकुमार दवे, नंदराज मुंगाजी, श्रुती म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, अरविंद सावळेकर यांच्यासह इंटकचे व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी –
        राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ताहीर पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अमित लोखंडे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला सिंह, अस्मिता पाटील, हरपिंडर वीर, सुदेशना नारायते, विनीत कांडपिळे, जयश्री खटकाले, शिला घोरपडे, सुनीता माळी यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात नाना पटोले यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. यावेळी सुदाम पाटील यांना काँग्रेसमध्ये लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याचे आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी दिले.

नाना पटोले यांनी विमानतळाला दिबांच्या नावाबद्दलचा निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले यासाठी त्यांचे आभार मानतो. पनवेलचे खरे वैभव स्व. विलासराव देशमुख यांच्यामुळेच आहे. पनवेलच्या नाट्यगृहाचे फंडिंग, उड्डाणपूल, पनवेलमधील सर्व काँक्रीटची भुयारी गटारे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाला निधी देण्याचे काम सुद्धा विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेसने केलेले आहे. ईडीच्या भीतीमुळे अनेकजण काँग्रेस सोडून गेले पण इथला कार्यकर्ता खचला नाही, नेटाने पुढे जात राहिला. पुन्हा पनवेल आणि उरण मतदारसंघात काँग्रेसचा तिरंगा फडकवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आम्ही अभिजित पाटील यांच्यासारखे नवीन नेतृत्व पनवेलला दिलेले आहे.
– महेंद्र घरत, महाराष्ट्र इंटक कार्याध्यक्ष

सुदाम पाटील यांच्या घरवापसीमुळे पनवेल काँग्रेसला मोठी ताकद मिळाली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस ठळक आकड्याने विजयी होईल. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांचा योग्य सन्मान काँग्रेस पक्ष करेल अशी ग्वाही देतो.
– अभिजीत पाटील, पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.