वेध सह्याद्री बीडखुर्द जांबरूंग पंचक्रोशी विभागाच्या प्रयत्नांनी मोहीम यशस्वी
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
कर्जत खालापूर तालुक्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे अनेक पुरावे आज या परिसरात पाहायला मिळतात. या इतिहासाची साक्ष परिसरातील अनेक लहान मोठे गडकिल्ले देत असतात.
असाच एक किल्ला म्हणजे कर्जत खालापूर हद्दीच्या मद्यभागी असलेला सोनगिरी किल्ला. खोपोलीहून पळसदरी कर्जत कडे जाताना अगदी सहज नजरेस पडणारा हा किल्ला कायमच दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे. तर संवर्धनाच्या प्रतीक्षेत असलेल्या “सोनगिरी” किल्ल्यावर वेध सह्याद्रीच्या बीडखुर्द जांबरुंग पंचक्रोशी विभागा मार्फत स्थानिक रहिवासी व सहकारी संस्था यांच्या सहकार्याने भव्य भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. सोनगिरी किल्ल्यावर पूर्वी असलेला ध्वज कमकुवत झाला होता, त्यावर कायम स्वरूपी उपाय योजना करत भक्कम 33 फुटी ध्वजस्थंभ किल्ल्यावर लावण्यात आला.
तसेच चढण्यास अतिशय अवघड असलेल्या किल्ल्यावर संस्थेच्या सदस्यांनी पोल चढवत उभारलेला ध्वजस्थंभ व भगवा ध्वज आता पळसदरी, केळवली सह आजूबाजूंच्या गावातून अगदी सहज नजरेस पडत असल्याने या कार्याबद्धल स्थानिकांनकडून वेध सह्याद्रीच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
ध्वज स्तंभ उभारल्या नंतर पूजनाचा व ध्वजारोहणाचा मान वेध सह्याद्री तर्फे गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात कार्यरत असल्या हिंदुस्थान दुर्गभ्रमण, बा रायगड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सह्याद्री प्रतिष्ठान, स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थांचे सदस्य तसेच नावंढे, पळसदरी व केळवली येथील ग्रामस्थांना देण्यात आला. त्याचबरोबर बाल शाहीर शौर्य निंबाळकर यांचे पोवाडे आणि श्लोक मते यांनी शिवकाव्य सादर केले असून अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडला.
तर केवळ ध्वज बसवून शांत न राहता येणाऱ्या काळात सोनगिरी किल्ल्यावर संवर्धन मोहिमांचे आयोजन करून किल्ल्याला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी वेध सह्याद्री मार्फत सांगण्यात आले.
Be First to Comment