पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट-कोस्ट या अमेरिकेतील संस्थेच्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात पराग बोरसे ब्राँझ पुरस्काराने सन्मानित
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट-कोस्ट या अमेरिकेतील संस्थेनी 2021 या वर्षीच्या “पेस्टल्स यु. एस.ए.”या त्यांच्या पस्तिसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात व्यक्तीचित्रण विभागात कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांना ब्राँझ पुरस्काराने सन्मानित केले आहे. कॅलिफोर्निया स्थित असलेल्या या संस्थेच्या प्रदर्शनासाठी जगभरातून आलेल्या हजारो चित्रांपैकी सॉफ्ट पेस्टल माध्यमामध्ये साकारलेली केवळ 99 चित्र निवडली गेली आहेत. पराग बोरसे यांचे “ग्रेसफुल अपिअरन्स”असे शीर्षक असलेले चित्र निवडले गेले आहे .
हे चित्र एका मेंढपाळाचे व्यक्तीचित्रण आहे. उन्हात राबणाऱ्या एका कष्टकरी माणसाचा हा चेहरा आहे. या माणसाने परिधान केलेला भगवा फेटा हा भारतीय संस्कृतीच्या वैराग्य आणि शोर्य या अविभाज्य घटकांच्या सौंदर्याची पाश्चिमात्य जगताला ओळख करून देत आहे. या माणसाच्या चेहऱ्यावरील रापलेली त्वचा आणि त्याच्या नजरेतील भेदकता ही अवर्णनीय आहे. एकूण बावीस देशांतीलववजववव चित्रांचा या प्रदर्शनामध्ये समावेश आहे.

भारतामधून निवडले गेलेले पराग बोरसे हे एकमेव चित्रकार आहेत. कोविड -19 या जागतिक महामारी मुळे गेली दोन वर्षे हे प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात होत आहे. यापूर्वी,2018 मध्येही पराग बोरसे यांना या संस्थेने त्यांचा सर्वोच्च समजला जाणारा “साऊथ-वेस्ट आर्ट मॅक्झिन” हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये “पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका” या न्यूयॉर्क मधील संस्थेनेही त्यांच्या याच व्यक्तिचित्रणाची प्रदर्शनासाठी निवड केली होती. यापूर्वीही पराग बोरसे यांना पेस्टल – जरनल मॅक्झिन अमेरिका, इंटरनॅशनल – आर्टिस्ट मॅक्झिन ऑस्ट्रेलिया अशा अनेक या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना यावर्षीच तरुण – तेजांकित पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

Be First to Comment