Press "Enter" to skip to content

क्रशर प्लांट मालकांची पत्रकार परिषद

प्रशांत‌ पाटीलांनी केलेल्या आरोपांच्या उडवल्या चिंधड्या

बिल्डर आणि आरएमसी लॉबी ची दलाली करत असल्याचा स्थानिक क्रशर प्लांट धारकांनी केला प्रशांत पाटिलांवर पलटवार           

सिटी बेल ∆ बेलापूर ∆

२६ मे  रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी वाशी येथील स्वकार्यालयात पत्रकार परिषद घेऊन स्वराज स्टोन एलएलपी वर ३ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला तसेच या कंपनीला स्थानिक क्रशर प्लांट धारकांचा विरोध असून सुद्धा राजकीय दबावाने करार करण्यात आल्याचे म्हटले होते. प्रशांत पाटील यांचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार ठरवत स्थानिक क्रशर प्लांट चालक मालकांनी काउंटर पत्रकार परिषद घेऊन प्रशांत पाटील यांनी केलेल्या आरोपांच्या चिंधड्या उडवल्या तसेच बिल्डर लॉबी आणि आर एम सी प्लांट लॉबी ची प्रशांत पाटील दलाली करत असल्याचे म्हटले.        

श्री कान्होबा दगड खाण व क्रशर मालक चालक सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ६७ सदस्य असलेल्या संघटनेचे सुमारे ४० सदस्य पत्रकार परिषदेला उपस्थित होते.  अध्यक्ष सुनील भोईर,उपाध्यक्ष मनोज आंग्रे आणि सचिव अतुल भगत यांनी उपस्थितांना संबोधित केले. भगत म्हणाले कि प्रशांत पाटील स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशी पत्रकार परिषद घेत आहे.मुळात जनाधार नसणाऱ्या या नेत्याला स्वबळावर एक ग्रामपंचायत सुद्धा निवडून आणता आलेली नाही. स्वराज स्टोन एलएलपी या कंपनी मुळे कुणाचेही नुकसान होणार नाही उलट सरकाच्या तिजोरीत स्वामित्व धानाच्या रूपाने महसुलात तिप्पट वृद्धी होणार आहे. आमच्या सारख्या स्थानिक उद्योजकांना स्थिर भाव मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुंबई मधील बिल्डर  लॉबी आणि रेडिमेड सिमेंट प्लांट लॉबी जी सरकार आणि आमची लूट करत होते त्याला आळा  बसणार आहे.        

भगत यांनी सविस्तर समजावून सांगितले कि कोरोना विषाणू संक्रमणामुळे या व्यवसायाची पार वाट लागली होती. बँकांचे हप्ते थकले होते. त्यामुळे या माफिया लॉबीने भाव पाडून आमची पिळवणूक सुरु केली होती. माल पडून राहण्यापेक्षा येतोय त्यादरात विकलेला बरा या भूमिकेतून आम्ही धंदा करत होतो. त्यात पराकोटीची स्पर्धा होतीच,प्रत्येकाने ४ ते ५ करोड रुपयांचे कर्ज काढले होते. ३४ क्रशर अशा खडतर परिस्थिती मुळे  बंद पडले आहेत. अशात स्वराज या कंपनीने येऊन आम्हाला स्थिर भाव दिला. आज सर्व व्यवहार स्वामित्व धन देऊन आणि जीएसटी सह देयके बनवून केला जात आहे. खडी साठी भाववाढ झाल्याने  घरांच्या किमती वाढतील असा प्रशांत पाटील यांनी  आरोप केला तो अत्यंत बिनबुडाचा आहे. मुळात भाववाढ झाली आहे ती स्वामित्व धन,वस्तू व सेवा कर हे सारे जोडल्यामुळे,आम्हाला देखील समाधानकारक स्थिर भाव मिळाला आहे.            

क्रशर व्यावसायिक थकलेले हप्ते,वाढलेले डिझेल चे दर ,३० ते ४५ दिवसांची द्यावी लागणारी उधारी,कच्च्या मालाचे वाढलेले दर या साऱ्याने त्रस्त झाले होते. त्यामुळे अशात आम्हला स्वराज कंपनी आशेचा किरण वाटते. आमच्यात कायदेशीर पद्धतीने करार झालेला आहे. तो करणे कुणालाही बंधनकारक नव्हते परंतु आमच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने करार केले आहेत. प्रशांत पाटील यांच्या पाठी कुणीही नाही. ते केवळ बिल्डर आणि आरएमसी वाल्यांची दलाली करत आहेत.   

पत्रकार परिषदेला सुनील भोईर, मनोज आंग्रे,अतुल भगत या पदाधिकाऱ्यांच्या सह ताहीर पटेल,रमण बोहरा,सचिन वास्कर, सतीश घरत दिपक ठाकूर आदींच्या सह अन्य सदस्य उपस्थित होते. 

आम्हाला आमचे अधिकार मिळवून देण्यासाठी भूमिपुत्रांना रक्त सांडावे लागले.५ हुतात्म्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली. प्रकल्पग्रस्तांना भूमी अधिग्रहणाचे योग्य पुनर्वसन मूल्य मिळवून देतांना आमचे भाग्यविधाते स्वर्गीय दि बा पाटील यांनी साडेबारा टक्के परताव्यासोबत येथील खाणी पट्टा स्थानिकांच्या उदरनिर्वाहासाठी राखून ठेवण्यास शासनाला भाग पाडले. या ठिकाणी आमच्या व्यवसायावर कुणी नियंत्रण ठेवावे याचे बाबत आम्ही विचार विनिमय करून संघटनेच्या माध्यमातून निर्णय घेत असतो. त्यामुळे आम्हाला कुणीही गृहीत धरून आमच्या वतीने वक्तव्य करू नयेत. …. सुनील भोईर, अध्यक्ष  ‌

प्रशांत पाटील यांच्या विश्वासार्हतेच्या बाबत आम्ही काय सांगावे? अहो अजित दादांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असताना त्यांच्या सोबत प्रशांत पाटील यांना फिरून दिले नाही. हेतुपुरस्सर पणे  राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस असून सुद्धा त्यांना लांब ठेवले होते. ते पक्षाचे नाही होऊ शकले ते अन्य कुणाचे काय होणार ? ‌– अतुल भगत,सचिव

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर संदेश टाकल्यापासून हा संघर्ष पेट धरतो आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव यांचे मेहुणे, दादासाहेब भुसे, गिरीश महाजन अशा सगळ्यांची नावे या व्यवसायात जोडली गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होत होता. एकंदरीतच राज्य पातळीवरील राजकारणाच्या साठमारी मध्ये स्थानिक क्रशर प्लांटवाल्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.