Press "Enter" to skip to content

शिक्कामोर्तब: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव

कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

सिटी बेल ∆ पनवेल ∆ हरेश साठे ∆

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे, त्याबद्दल लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा भाजपच्यावतीने आज या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २९ तारखेला सरकार अल्पमतात असताना घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला होता. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांसह सर्व समाजातील व्यक्तीचा सन्मान केला. त्याबद्दल सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सदरचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, पनवेलचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालय येथे उत्तर रायगड भाजपच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला. दिबासाहेबांचा विजय असो, दिबासाहेब अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा देतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हा संयोजक डॉ. कृष्णा देसाई, निर्दोष केणी, मधुकर उरणकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व आनंदाचा हा निर्णय आहे. शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते, दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार, विरोधीपक्षनेते म्हणून दिबासाहेबांनी केलेल्या कामाला तोड नाही. त्यांनी भूमिपुत्रांमध्ये समाजामध्ये ऊर्जा निर्माण केली स्वाभिमान जागृत केला. त्यामुळे त्यांच्या भूमीतील विमानतळाला दिबासाहेबांचेच नाव लागले पाहिजे यासाठी सर्व समाजातील लोकं प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्र एकसंघ झाली. त्या अनुषंगाने भव्य आंदोलने झाली, लढ्याला यश आले. आम्हाला आनंद आहे कि, राज्य सरकारने दिबासाहेबांच्या नावाचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. ‌ ‌ – लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल तालुक्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव राज्य मंत्रीमंडळाने केला. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. दिबासाहेब प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र, सर्वांसाठी लढले. त्यांचे नेतृत्व करीत त्यांनी सर्वाच्या जीवनाला नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्याचा आज गौरव करत राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्याबद्दल मी पुन्हा आभार मानतो. भूमिपुत्रांच्या सर्व जिल्ह्याने आंदोलनाला साथ दिली. त्या सगळ्यांच्या मागणीचा रेटा तयार झाला. सर्व भूमिपुत्रांचेही अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर या ठरावाची अमंलबजावणी व्हावी, यासाठी आपण सर्व प्रयत्न करीत राहू या. ‌ ‌ – आमदार प्रशांत ठाकूर

समितीने उभारलेले आंदोलने, मागणीचा रेटा आणि त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नामकरणासर्भात दोन वेळा बैठक झाली. मात्र ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावावर ठाम राहून आपला हेका कायम ठेवला आणि दिबासाहेबांचे नाव विमानतळाला देण्यास नकार दिला होता. सरकार अल्पमतात आल्यावर श्रेयासाठी ठाकरे यांनी अवैध्य प्रकारे निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयात कायदेशीर बाब अडसर ठरला असता त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने घाईघाईने नाही तर भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करून निर्णय घेतला आहे. ‌ ‌‌ – अरुणशेठ भगत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.