अवघ्या सातव्या वर्षी देत आहे प्राण्या- पक्षांच्याप्रती भूतदया जपण्याचा संदेश
सिटी बेल • पनवेल •
या जगात उपदेशाचे बोधामृत पाजणारे पावलोपावली मिळतात. स्वतःच्या कृतीतून समाजाला दिशा दाखविणारे अगदी मूठभरच असतात. असे काम जर अवघ्या ७ वर्षाची चिमुरडी करत आहे असे म्हटले तर तुम्हा सर्व वाचकांच्या भुवया नक्कीच उंचावतील.म्हणून नव्या च्या पक्षीप्रेमाची क्यूटशी स्टोरी आवर्जून वाचा.
ही पक्षी प्रेमाची कहाणी आहे नव्या रविंद्र म्हात्रे हीची. नव्या सध्या महत्मा स्कूल ऑफ अँकॅडमिक्स च्या CBSC शाळेत शिकत आहे. अवघ्या सात वर्षांची नव्या सुमारे वीस दिवसांपूर्वी मुजुमदार यांच्याकडे शिकवणीला चालली होती. तिचे बाबा तिला स्कुटी वरती सोडायला जात असतात. तेवढ्यात एका झाडावरून एक छोटासा पक्षी जखमी होऊन त्यांच्या स्कूटी समोर पडला. नव्या त्या जखमी पक्षाला घेऊन घरी आली. त्याला मलमपट्टी केली, त्याला खाऊ-पिऊ घालू लागली. नव्याच्या सुशृषेमुळे तो लहानसा पक्षी पटापट बरा होऊ लागला. पंधरा दिवसानंतर त्याला उडता येऊ लागले. आता या पक्षाला आपण सोडून दिले पाहिजे असे नव्याला वाटले. संपूर्ण उपचारादरम्यान हा पक्षी मोकळाच होता म्हणजे त्याला कुठेही डांबून ठेवलं नव्हतं. पक्षी उडाला आणि बाहेर छान विहरू लागला.
खरं तर आजच्या जगात नेकी कर औंर दरिया में डाल….याच वृत्तीने वागावं लागतं. कारण केलेले उपकार चटकन विसरणं हे हल्ली मनुष्याचा स्वभावधर्म झाला आहे. पण या छोट्याश्या पक्षाने मात्र नव्यान दिलेलं जीवदान चिरकाल स्मरणात ठेवलेलं आहे. नव्याचे आभार मानण्यासाठी, तिची भेट घेण्यासाठी हा पक्षी रोज रवींद्र म्हात्रे यांच्या घरी येत आहे…
जेवढं कौतुक त्या पक्षाचं तेवढेच कौतुक नव्याच सुद्धा करावे लागेल. हल्ली माणूस माणसाच्या मदतीला जात नाही,प्राणी-पक्षी तर लांबच राहिले. पण या छोट्याशा क्युट नव्याने मात्र आपल्या डोळ्यात अंजन घातले आहे.प्राणी पक्षी यांच्या प्रति भूत दया जपली पाहिजे. निसर्गाचे रक्षण केलं पाहिजे, निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. नव्या च्या या असामान्य कार्यामुळे तिच्यावरती स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे.
Be First to Comment