काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानात कोकण विभागातून रायगड जिल्हा अव्वल
काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाबाबत उलवे येथे आढावा बैठक संपन्न
अभियान प्रमुख पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आढावा बैठक
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अप्रतिम नियोजनाने जिंकली उपस्थितांची मने
सिटी बेल • उलवे •
भारतीय काँग्रेसच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी चे अभियान हाती घेण्यात आले होते. मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून देशपातळीवर सुरू झालेल्या या अभियानाला जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्यामध्ये प्रारंभ करण्यात आला. 31 मार्च रोजी डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाची सांगता होत आहे. आत्तापर्यंत झालेल्या नोंदणीची आणि ह्या पुढील नोंदणीची रणनीती यांची चर्चा करण्यासाठी पनवेल तालुक्यातील उलवे नोडे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या सभागृहात मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी कोकण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या अभियानाचे प्रमुख, काँग्रेस पक्षाचे पी आर ओ, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

कोकण विभागांमध्ये तेरा संघटना जिल्ह्यांचा समावेश होतो. सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील नोंदणीची परिस्थिती विशद करून 31 मार्चपर्यंत होणाऱ्या संभाव्य नोंदणीबाबत उपस्थितांना अवगत केले. यामध्ये रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी ही सदस्य नोंदणी मध्ये अव्वल असल्याचे निदर्शनास आले. तर 31 मार्चपर्यंत तब्बल पन्नास हजार कार्यकर्त्यांची नोंदणी करून दाखवू असा विश्वास अध्यक्ष महेंद्र घरत यांनी प्रकट केला. डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाच्या असिस्टंट पी आर ओ, राजस्थान मधील आमदार सुवर्ण पदक विजेत्या थाळीफेक पटू, अर्जुन पुरस्कार प्राप्त कृष्णा पुनिया यांची उपस्थिती या आढावा बैठकीचे विशेष आकर्षण ठरली.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव, या अभियानाचे कोकण प्रभारी बी एम संदीप,कृष्णा पुनिया, अभियानाचे राज्य समन्वयक आमदार प्रणिती शिंदे, भाई नगराळे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभागाचे प्रभारी नसीम खान यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उत्तम नियोजनाचे या वेळी तमाम उपस्थितांनी कौतुक केले.

या आढावा बैठकीला समन्वयक डिजिटल नोंदणी राहुल साळवे,रायगड च्या प्रभारी चारुलता टोकस, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी हुस्न बानो खलिफे,राणी अगरवाल, प्रमोद मोरे,राजन भोसले, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई आर सी घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कॅप्टन कलावत आदी मान्यवरांच्या सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खोटे बोलून देशाची दिशाभूल करणारे केंद्रातले भाजपचे सत्ताधारी आणि काँग्रेस पक्ष यांच्यातील फरक स्पष्ट करणारे हे नोंदणी अभियान आहे. एकीकडे जातीय तेढ निर्माण करून खोट्या बातम्या पसरवून हुकूमशाही पद्धतीने देशावर राज्य करणे सुरु आहे. या सत्ताधारी मंडळींनी मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी अभियान राबवले आणि कोट्यावधींचे खोटे आकडे फुगवून सांगितले. परंतु काँग्रेस पक्षाने मात्र अत्यंत पारदर्शक पद्धतीने प्रामाणिक नीतीने आणि लोकांच्यात जाऊन डिजिटल सदस्य नोंदणी चे अभियान राबविले आहे. खोट्या आकड्यांचे फुगवटे हवेत सोडण्यापेक्षा सच्चे कार्यकर्ते जोडले गेले पाहिजेत यावर काँग्रेस पक्ष भर देतो.
– पल्लम राजू.













Be First to Comment