Press "Enter" to skip to content

रायगडचे महाराष्ट्र बॅडमिंटनवर निर्विवाद वर्चस्व; मुला-मुलींचा ऐतिहासिक दुहेरी सुवर्णवेध !

अंडर-१७ मुला-मुलींचे अजिंक्यपद; अंडर-१९ मुलींचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद; वरिष्ठ महिला संघाचीही ऐतिहासिक कामगिरी 

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाला यशाची झळाळी; रायगडच्या बॅडमिंटन क्षेत्राला नवी ऊर्जा, युवा खेळाडूंची राज्यस्तरावर दमदार छाप!

पनवेल (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील युवा बॅडमिंटनपटूंनी आपल्या असामान्य कौशल्याच्या, जिद्दीच्या आणि सांघिक एकजुटीच्या जोरावर महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. राज्यातील विविध वयोगटांतील आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये रायगडच्या मुला-मुलींनी मिळवलेल्या देदीप्यमान यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र सब-ज्युनिअर अंडर-१७ आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रायगडच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी विजेतेपद पटकावत दुहेरी सुवर्णवेध साधत मुलींच्या संघाने आपले विजेतेपद कायम राखले, तर मुलांच्या संघाने प्रथमच अजिंक्यपदावर नाव कोरून रायगडच्या बॅडमिंटन इतिहासात नवा सुवर्णाध्याय लिहिला. तसेच चंद्रपूर येथे झालेल्या अंडर-१९ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रायगडच्या मुलींनी सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले, तर सातारा येथे झालेल्या वरिष्ठ महिला आंतरजिल्हा सांघिक स्पर्धेत रायगडच्या संघाने प्रथमच अजिंक्यपद मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. विविध वयोगटांतील या यशस्वी वाटचालीमुळे रायगडच्या बॅडमिंटन क्षेत्राचा वाढता दर्जा आणि खेळाडूंची क्षमता अधोरेखित झाली आहे. रायगड बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष व नगरसेवक परेश ठाकूर यांच्या नेतृत्वातून, मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातून जिल्ह्यातील बॅडमिंटन चळवळीला मिळत असलेले बळ या यशाच्या निमित्ताने विशेषत्वाने पुढे आले आहे.

अंडर-१७ स्पर्धेत रायगडचा दुहेरी सुवर्णवेध; मुलांनी प्रथमच रचला इतिहास!

पुणे येथे ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या योनेक्स-सनराईज एसबीए कप महाराष्ट्र सब-ज्युनिअर अंडर-१७ आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत रायगडच्या मुलींच्या संघाने पुण्याच्या संघाचा २-१ असा पराभव करत विजेतेपदावर पुन्हा एकदा मोहोर उमटवली. गतविजेतेपद कायम राखत रायगडच्या मुलींनी आपल्या खेळातील सातत्य आणि वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे, मुलांच्या संघानेही अंतिम सामन्यात बुलढाण्याच्या संघाला २-१ असे पराभूत करत प्रथमच अंडर-१७ आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद पटकावले. रायगडच्या मुलांच्या संघासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. निर्णायक क्षणी दाखवलेला आत्मविश्वास, प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानाला दिलेले चोख प्रत्युत्तर आणि विजयासाठी शेवटपर्यंत केलेले प्रयत्न यामुळे दोन्ही संघांनी आपल्या कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली. विजेत्या मुलींच्या संघात अनुष्का एप्टे, प्रांजल शिंदे, अनन्या सिंह, आयुषी निरवण, रिधिमा म्हात्रे आणि सोनम कुमारी यांचा समावेश होता. तर मुलांच्या विजयी संघात क्रित्य पटेल, प्रज्ञान शिंदे, प्रथम राऊत, मयुरेश भुटकी आणि वीयूम अग्रवाल यांनी आपल्या खेळातील कौशल्य दाखवत रायगडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलींच्या संघाने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावत आपली सातत्यपूर्ण कामगिरी अधोरेखित केली, तर मुलांच्या संघाने प्रथमच अजिंक्यपद जिंकून जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवी नोंद केली. या दुहेरी यशामुळे रायगडच्या युवा बॅडमिंटनपटूंच्या गुणवत्तेची राज्यभर चर्चा होण्यास मदत झाली आहे.

अंडर-१९ मुलींचे सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद; रायगडच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब!

रायगडच्या मुलींनी अंडर-१७ स्पर्धेतील विजयी कामगिरीपूर्वीच अंडर-१९ गटातही आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली होती. चंद्रपूर येथे झालेल्या योनेक्स-सनराईज महाराष्ट्र ज्युनिअर अंडर-१९ आंतरजिल्हा राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रायगडच्या मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व कायम राखले.अंतिम सामन्यात रायगडच्या संघाने पुण्याच्या संघाचा २-० असा सरळ पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ, अचूक फटके, वेगवान हालचाली आणि सांघिक समन्वय यांच्या जोरावर रायगडच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. अंतिम सामन्यातही त्यांनी आपल्या खेळाचा दर्जा कायम राखत पुण्याच्या संघाला वरचढ होण्याची संधी दिली नाही.विजेत्या रायगड संघात प्रांजल शिंदे, श्रावणी पडवळ, गाथा सूर्यवंशी, अनन्या सिंह, अनुष्का एप्टे आणि आयुषी निरवण यांचा समावेश होता. सलग दुसऱ्यांदा मिळवलेले हे विजेतेपद म्हणजे रायगडच्या मुलींच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि उत्कृष्ट खेळाचे फलित आहे. एका स्पर्धेतील विजयावर समाधान न मानता पुढील स्पर्धेतही सर्वोत्तम कामगिरी करण्याची तयारी, जिंकण्याची जिद्द आणि सांघिक एकजूट यांमुळे रायगडच्या मुलींनी अंडर-१९ गटात आपले वर्चस्व कायम राखले. या यशाने अंडर-१७ स्पर्धेतील विजयासाठीही सकारात्मक पार्श्वभूमी निर्माण केली.

वरिष्ठ महिला संघाचा ऐतिहासिक विजय; बलाढ्य ठाणे संघावर मात

रायगडच्या बॅडमिंटन क्षेत्रासाठी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी सातारा येथे झालेल्या वरिष्ठ महिला आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत नोंदवली गेली. या स्पर्धेत रायगडच्या महिला संघाने प्रथमच विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. अंतिम सामन्यात ठाण्याच्या बलाढ्य संघाला २-१ अशा फरकाने पराभूत करत रायगडच्या खेळाडूंनी आपल्या जिद्दीचे, कौशल्याचे आणि सांघिक एकजुटीचे दर्शन घडवले.या स्पर्धेत रायगडच्या संघाने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण खेळ केला. सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या संघांवर प्रत्येकी २-० अशी मात करत रायगडने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम सामन्यात ठाण्याच्या संघाने कडवी झुंज दिली; मात्र रायगडच्या खेळाडूंनी दबावाखालीही आपला खेळ उंचावत विजयाच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली.अंतिम सामन्यातील निर्णायक लढतीत रायगडच्या अनुष्का एप्टे हिने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. महाराष्ट्रातील अनुभवी खेळाडू आर्या कुर्गांवकर हिच्याविरुद्ध खेळताना अनुष्काने प्रभावी खेळ करत विजय मिळवला आणि रायगडच्या ऐतिहासिक अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. तिच्या या कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास अधिक उंचावला आणि रायगडच्या महिला संघाला प्रथमच वरिष्ठ महिला आंतरजिल्हा सांघिक विजेतेपद मिळवता आले.विजेत्या रायगड संघात प्रांजल शिंदे, श्रावणी पडवळ, गाथा सूर्यवंशी, अनन्या सिंह आणि अनुष्का एप्टे यांचा समावेश होता. श्रीशैल मितकरी यांनी संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली.विशेष म्हणजे, गतवर्षी या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या रायगडच्या खेळाडूंनी यंदा आपल्या कामगिरीत उल्लेखनीय सुधारणा केली आणि थेट विजेतेपदाला गवसणी घातली. या कामगिरीतून रायगडच्या महिला बॅडमिंटनपटूंची वाढती क्षमता, स्पर्धेतील अनुभव आणि निर्णायक क्षणी विजय खेचून आणण्याची ताकद स्पष्ट झाली. या सुवर्ण यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, बॅडमिंटन कमिटी यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.