
उरणची लेक निघाली युवा ऑलिंपिकला ! प्रियांशीच्या पाठीवर महेंद्रशेठ घरत यांची आशीर्वादाची थाप !
उलवे, ता. २ : उरणची लेक प्रियांशी मयूर पाटील ही युवा ऑलिंपिकला निघाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथील डकार येथे युवा ऑलिम्पिक होत आहे. त्यात अवघ्या १४ वर्षांची प्रियांशी युवा ऑलिंपिकमध्ये विंडसर्फिंगसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती उरण केगाव-दांडा येथे राहते. युवा ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील ती अतिशय कमी वयाची आहे.
युवा ऑलिंपिकला प्रयाण करण्यापूर्वी सोमवारी (ता. २) प्रियांशी पाटील महेंद्रशेठ घरत यांचे आशीर्वाद घ्यायला आली होती. तेव्हा महेंद्रशेठ घरत यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून युवा ऑलिंपिकसाठी तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रियांशीचे कौतुक करताना महेंद्रशेठ म्हणाले, ‘भारताला आजपर्यंत युवा ऑलिंपिकमध्ये विंडसर्फिंगमध्ये एकही पदक मिळालेले नाही. प्रियांशी ही जिद्दी आहे, ती समुद्राच्या लाटांसोबत सहज खेळते. ती आम्हा रायगडवासीयांचा अभिमान आहे. त्यामुळे ती भारताला पदक मिळवून देणारच. तिच्या पाठीमागे मी खंबीरपणे कायम आहेच.”
यावेळी प्रियांशी पाटील म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांनी खूप प्रोत्साहन दिले आहे. माझ्यासाठी जिवाचे रान केले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत साहेब यांनी मला जी आजपर्यंत साथ दिली आहे, तिला तोड नाही. त्यांनी मला कधीही रिकाम्या हाताने पाठवले नाही. त्यांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. मी देशाचे नाव उंचावेन, हे मी अभिमानाने सांगते.”

सिंगापूर इंटरनॅशनल ओपन विंडसर्फिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये तिने कांस्य पदक मिळविले आहे. प्रियांशी ही २०२५ आणि २०२६ मधील डबल एशियन मेडलिस्ट आहे. तिने गेल्या वर्षभरात १५ नॅशनल आणि ३ इंटरनॅशनल पदके पटकावली आहेत. ती एक उत्तम जलतरणपटूही आहे. त्यामुळे सध्या तिचे नाव देशभर चर्चिले जात आहे. ती सध्या रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल (उरण-बोरी) येथे नववीत शिकत असून कुठल्याही प्रशिक्षकाशिवाय ती आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्याने आई-वडिलांना तिचा विविध स्पर्धांना जाण्याचा आणि प्रशिक्षणाचा खर्च पेलवत नाही. मात्र आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आजपर्यंत तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. ज्या ज्या वेळी तिला गरज होती तेव्हा महेंद्रशेठ घरत यांनी तिला आर्थिक केले आहे. आई-वडिलांची कठोर मेहनत आणि महेंद्रशेठ घरत यांची सहकार्याची भूमिका यामुळेच तिने आज युवा ऑलिंपिकपर्यंत थडक मारली आहे.
याप्रसंगी सिटी बेल चे संपादक विवेक पाटील व मंदार दोंदे तसेच पत्रकार कृष्णा पाटील उपस्थित होते.
प्रियांशीची घवघवीत कामगिरी :
एशियन चॅम्पियनशिप (थायलंड) २०२५ नोव्हेंबरमध्ये रौप्यपदक.
सध्या ती विंडसर्फिंग वर्ल्ड
चॅम्पियनशिप २०२६ मध्ये टॉप टेनमध्ये आहे.
युरोपियन चॅम्पियनशिप जुलै २०२६ मध्ये झाली. त्यात ती सहभागी झाली होती.
एशियन चॅम्पियनशिप (मलेशिया) ४ ते ८ ऑगस्ट २०२६ मध्ये कांस्यपदक.
ती नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे.


Be First to Comment