Press "Enter" to skip to content

दुकानदारांच्या समस्या आणि महागाईच्या प्रश्नावर संघटना आक्रमक !

शासकीय पातळीवर दुकानदारांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणार; सर्वसामान्य जनतेला महागाईतून दिलासा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार — भरत पाटील

पनवेल : रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशन, पनवेल यांच्या वतीने दिनांक ३१/१०/२०२६ रोजी संघटनेचे अध्यक्ष श्री. भरत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शाखा, सेक्टर-९, खांदा कॉलनी, पनवेल येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

बैठकीत पनवेल तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध समस्या, प्रलंबित मागण्या आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीतील प्रमुख मुद्दे :

  • रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध प्रशासकीय व तांत्रिक समस्या शासनदरबारी मांडून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणे.
  • दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वरिष्ठ शासकीय अधिकारी व संबंधित विभागाकडे ठोस भूमिका मांडणे.
  • दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान अत्यंत कठीण झाले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणून जनतेला दिलासा देण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे संघटनेच्या वतीने मागणी करणे.
  • दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने लढा देण्याचा निर्धार.
  • संघटनेच्या कार्यात वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी व दुकानदारांच्या असहकार्याबाबत चर्चा करून सर्वांनी संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन.

यावेळी अध्यक्ष श्री. भरत पाटील यांनी दुकानदारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने तातडीने दखल घेऊन समस्यांचे निराकरण करावे, अशी भूमिका मांडली. दुकानदारांच्या हक्कासाठी तसेच महागाईच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी संघटना शासनदरबारी ठोस मागण्या करणार असल्याचे स्पष्ट केले.

दुकानदारांच्या समस्या आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर संघटना गप्प बसणार नाही; न्याय मिळेपर्यंत संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.