
गगनगिरी महाराज आश्रम परिसरात हेल्प फाउंडेशनच्या सर्पमित्रांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहराची आध्यात्मिक ओळख असलेल्या परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या पवित्र आश्रम परिसरात ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे एक विलक्षण घटना घडली. आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोरील गटाराच्या चेंबरमध्ये एक अजगर अडकल्याचे पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. त्याची हालचाल होत नसल्याने हेल्प फाउंडेशनच्या सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्रांनी घटनास्थळी दाखल होत सुटकेचे प्रयत्न सुरू केले. अजगराची घुसमट होऊ नये म्हणून गुरुनाथ साठेलकर यांनी स्वतः अंडरग्राउंड चॅनेलमध्ये उतरून त्याच्या श्वसनाचा मार्ग सुकर केला.

आश्रम व्यवस्थापनानेही तातडीने प्लंबर आणि सिव्हिल एजन्सीला बोलावून यंत्रसामग्रीच्या मदतीने अजगराला बाहेर येण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार केला. मात्र, जबरदस्तीने बाहेर काढणे त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे लक्षात घेऊन त्याला स्वतःहून बाहेर येण्याची संधी देण्यात आली. ३० ऑक्टोबरच्या रात्री त्याच्या हालचाली सुरू झाल्या, मात्र तो पुन्हा आत गेला. ३१ ऑक्टोबरच्या पहाटे बाहेर येण्याचा प्रयत्न करताना त्याच्या शरीरावर लोखंडी रिंग अडकलेली असल्याचे दिसून आले.
३१ ऑक्टोबरच्या सकाळी हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी पुन्हा नियोजनबद्ध प्रयत्न करत अजगराच्या शरीरात रुतून बसलेली लोखंडी रिंग काढली आणि अखेर त्याची सुखरूप सुटका केली. रिंगमुळे झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी त्याला दिनेश ओसवाल यांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
या संपूर्ण मोहिमेत आश्रम व्यवस्थापनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सहकार्याची भूमिका बजावली. अनेक भाविकांनीही अजगराच्या सुटकेसाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे, सुटकेच्या वेळी आश्रमाच्या इमारतीवर जमलेल्या माकडांचे चित्रविचित्र चित्कारही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

या मोहिमेत हेल्प फाउंडेशनचे सर्पमित्र प्रवीण तावडे, दिनेश ओसवाल, सुनील पुरी, अमोल ठकेकर, अमोल कदम, अरविंद गुरव, गुरुनाथ साठेलकर, चंदन कदम, मंगेश घोडके आणि निलेश यादव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. परिसरातील रिक्षाचालकांनीही मोलाची मदत केली.
प. पू. गगनगिरी महाराजांच्या पवित्र आश्रम परिसरात घडलेल्या या घटनेने अध्यात्मातील जीवदयेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अनुभवायला मिळाला. आश्रम व्यवस्थापनाची संवेदनशीलता आणि हेल्प फाउंडेशनच्या सर्पमित्रांची जिद्द यामुळे एका मुक्या जीवाला नवे जीवन मिळण्याची संधी निर्माण झाली.
कारण माणुसकीची खरी ओळख केवळ माणसांसाठी केलेल्या मदतीत नसते, तर मुक्या जीवांच्या वेदना समजून त्यांच्या जगण्याचा हक्क जपण्यातही असते हे या निमित्ताने अधोरेखित झाले.


Be First to Comment