Press "Enter" to skip to content

रानडुकराच्या मादीसह पिल्लांना जीवदान ! बचावकार्यानंतर मृत पिल्लाला तोंडात घेऊन जाणाऱ्या रानमातेला पाहून वन कर्मचारी झाले भावूक

खोपोली, दि. १ नोव्हेंबर २०२६ :

खोपोलीजवळील सायमाळच्या विरुद्ध दिशेला असलेल्या वनक्षेत्रात गस्त घालत असताना वन विभागाचे कर्मचारी राजेश खांडेकर आणि विकी घुटे यांना रानडुकराची मादी आपल्या पिलांसह जुन्या पाणी साठवण टाकीत पडल्याचे आढळले. बाहेर पडण्याचे प्रयत्न करूनही रान डुकराच्या मादीला यश येत नसल्याने वन कर्मचाऱ्यांनी तातडीने हेल्प फाउंडेशनची मदत मागितली.

घटनास्थळी दाखल झालेल्या हेल्प फाउंडेशनच्या पथकाने सुरुवातीला रोपच्या साहाय्याने मादीला बाहेर काढण्याची तयारी केली. मात्र, ती आक्रमक झाल्याने तिला बेशुद्ध करून बाहेर काढण्याचा पर्याय विचारात घेण्यात आला. त्यासाठी पेट फोर्स, पुणेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिस्थितीचा विचार करून मादीला बेशुद्ध करण्याऐवजी वापरात नसलेल्या टाकीची भिंत तोडून बाहेर पडण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला.

या मोहिमेत हेल्प फाउंडेशनच्या वतीने गुरुनाथ साठेलकर, अमोल कदम, अमोल ठकेकर, निलेश यादव, पंकज बागुल, निखिल ढोले, सुनील पुरी, भक्ती साठेलकर, साईश सुनील पुरी आणि धनंजय शिद सहभागी झाले होते. पेट फोर्स, पुणे येथील सदस्यांनीही बचावकार्यात सहकार्य केले. वन विभागाचे कर्मचारी राजेश खांडेकर आणि विकी घुटे यांच्या समन्वयातून ही मोहीम पुढे सरकली.

दरम्यान, टाकीत अडकलेल्या मादीचा आणि पिल्लांचा आकांत ऐकून परिसरात रान डुकरांचा एक मोठा कळपही घटना स्थळाच्या जवळ वावरताना दिसत होता. बचाव पथकाने जाळीच्या साहाय्याने पिल्लांना बाहेर काढले, तर टाकीची भिंत तोडून तयार केलेल्या मार्गातून मादीही सुखरूप बाहेर पडून आपल्या अधिवासाच्या दिशेने निघून गेली.

दुर्दैवाने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तीन पिल्लांपैकी एका पिल्लाचा मृत्यू झाला होता. उर्वरित जीवांची सुटका झाली असली, तरी या एका निष्पाप जीवाचा झालेला मृत्यू सर्वांसाठी हळहळ व्यक्त करणारा ठरला.

बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने वन कर्मचारी पुन्हा घटनास्थळी गेले असता त्यांना एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. रानडुकराची मादी आपल्या मृत पिल्लाला तोंडात पकडून तेथून घेऊन जात होती. संकटातून सुखरूप बाहेर पडलेली ही मादी आपल्या मृत पिल्लालाही मागे सोडण्यास तयार नव्हती.

मातेची माया दर्शविणारे दृश्य पाहून वन कर्मचारीही भावूक झाले. या प्रसंगाने मातृत्वाची भावना केवळ माणसांपुरती मर्यादित नसल्याची जाणीव करून दिली.

प्रसंगावधान, योग्य निर्णय आणि समन्वयाच्या जोरावर पार पडलेल्या या बचाव मोहिमेत वन विभाग, हेल्प फाउंडेशन आणि पेट फोर्स – पुणे यांच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. वन्यजीव संरक्षणासाठी दाखविलेली ही तत्परता आणि मुक्या जीवांप्रती असलेली संवेदनशीलता निश्चितच कौतुकास्पद ठरली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.