प्राथमिक शाळा शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अधिवेशनानंतर विशेष बैठक आयोजित करणार : खासदार शरद पवार
सिटी बेल • पनवेल •
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने शिक्षण परिषद व भव्य वार्षिक अधिवेशन पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
या शिक्षण परिषदेस जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कोकण शिक्षक मतदार संघाचे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आमदार बाळाराम पाटील हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष होते.
स्वागताध्यक्ष आमदार बाळाराम पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. प्राथमिक शिक्षक संघाचे आणि रायगड जिल्ह्याचे नाते फार जुने आहे असे ते म्हणाले. आज जरी शिक्षकांना सहा आकडी पगार असले, तरी त्यांच्या इतर प्रलंबित समस्यांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मागच्या आठवड्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी फार काही तरतूद आढळून येत नाही.९० हजार शिक्षकांच्या वेतनात त्रुटी आहेत, तर ४५ हजार फक्त २० टक्के पगारावर काम करत आहेत. पती-पत्नी शिक्षक असणाऱ्यांच्या बदल्या तीस किलोमीटर वर्तुळात व्हाव्यात अशी अपेक्षा असते परंतु वास्तवात तसे होत नाही. छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये ज्याप्रकारे निवृत्तिवेतन आहे त्याच स्वरूपाचे निवृत्तिवेतन आपल्या राज्यात देखील सुरू व्हावे. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर व्हाव्यात. जिल्हा परिषद शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा या आमच्या शासन दरबारी मागण्या आहेत.. असे आमदार बाळाराम पाटील प्रास्ताविकात म्हणाले.
यानंतर शिक्षकांचे लाडके तात्या अर्थातच संभाजीराव थोरात, रायगडच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार निलेश लंके यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाला यावेळी शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्य अध्यक्ष अंबादास वाजे,सरचिटणीस बाबासाहेब जगताप, राज्य प्रतिनिधी अविनाश म्हात्रे, म. ज.मोरे, रायगड जिल्हा अध्यक्ष बाबुराव पालकर, सरचिटणीस बाबासाहेब जगताप, बाळासाहेब झावरे, पोपटराव सूर्यवंशी, मच्छिंद्रनाथ मोरे, संघाच्या महिला आघाडी राज्य प्रमुख डॉक्टर स्वाती शिंदे, बाळकृष्ण तांबारे, एन वाय पाटील, मधुकर साटोळे,संजय फुंडे आदी मान्यवर यांच्यासह राज्यभरातून आलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यभरातील दीड लाख सदस्य संख्या असलेली ही संघटना अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. संघटनेचे आणि शरद पवार साहेब यांचे असलेले ऋणानुबंध लक्षात घेता शरद पवार साहेबांनी व्यस्त शेड्युलमध्ये देखील संघटनेला आजच्या कार्यक्रमाची वेळ दिली. धुळवडी सारखा सण असून देखील संघटनेतील हजारो सदस्य शिक्षण परिषदेस उपस्थित राहिले. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे भव्य दिव्य अशा शामियान्यात २५ हजार शिक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही सगळ्यात जुनी संघटना आहे. गेली दोन वर्षे कोरोनाविषाणू चा प्रभाव असल्यामुळे अधिवेशन होऊ शकले नाही याची खंत आहे. जुनी पेन्शन योजना लागू होणे यासह अन्य प्रलंबित मागण्या करिता अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर विशेष बैठकीचे आयोजन करून त्यात संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पाचारण करणार.
– राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार.
आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी च्या मुहूर्तमेढीचे आणि शरद पवार साहेब यांचे एक अनोखे नाते असल्याचे सांगितले. त्यांचे वडील माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून ७० लाखांची थैली देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात शरद पवार साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी एक करोड पेक्षा जास्त थैली जमली. माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांनी ती तशीच्या तशी आमदार विवेक पाटील यांना सुपूर्द केली व गोरगरिबांच्या मुलांसाठी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी भव्यदिव्य अशी स्पोर्ट्स अकॅडमी बांधावी अशी इच्छा प्रकट केली. तात्यांचे स्वप्न विवेक पाटील यांनी पूर्ण केले. आणि त्याच कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये आज शिक्षण परिषदेत शरद पवार साहेबांनी पुन्हा उपस्थित राहणे हे आमच्यासाठी सौभाग्याचे आहे असे आमदार बाळाराम पाटील म्हणाले.
Be First to Comment