लेट एम एस तांडेल इंटरॅशनल स्कूल चा विद्यार्थी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात चमकला
सिटी बेल ∆ पनवेल ∆
कासारभाट येथील लेट एम एस तांडेल इंटरॅशनल स्कूल ने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश प्राप्त केले आहे. पराग चंद्रशेखर मोरे याने सादर केलेल्या टेस्ला कॉइल या विज्ञान प्रयोगाला विद्यार्थी प्रतिकृती श्रेणीमध्ये द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.५१ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस आर मोहिते यांनी एका पत्रकाद्वारे तालुक्यातील निकाल जाहीर केले आहेत.
लेट एम एस तांडेल इंटरॅशनल स्कूल येथील पराग मोरे याच्या विज्ञान प्रयोगाचे बाबत अवगत करणारा व्हिडिओ या बातमीच्या खाली पाहायला मिळेल.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करताना विद्यार्थ्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन गट केले जातात. प्रत्येक गटामध्ये विद्यार्थी प्रतिकृती आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती अशा दोन श्रेण्या असतात.९ वी ते १२ वी पर्यंतच्या माध्यमिक गटातून पराग मोरे यांच्या प्रतिकृतीने द्वितीय पारितोषिक पटकावले. टेस्ला कॉईल चा प्रयोग त्याने सादर केला.
प्रिन्सिपल संगीता पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिक्षिका प्राप्ती पाटील, संजना पाटील, निकिता म्हात्रे आणि धनुप्रिया म्हात्रे यांनी पराग यास प्रयोग प्रतिकृती साकारण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
यापूर्वी लेट एम एस तांडेल इंटरनॅशनल स्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ऑफलाईन पद्धतीने भरविण्यात आले होते. आत्तापर्यंत झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात या शाळेने केलेले आयोजन हे सर्वोत्कृष्ट नियोजन म्हणून नावाजले जाते. त्यानंतर आलेल्या कोरोना विषाणूमुळे ऑफलाइन विज्ञान प्रदर्शन बंद करण्यात आले.
विद्यार्थ्यांची सोय म्हणून सुरू करण्यात आलेले ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन अद्यापही ऑफलाइन पद्धतीने सुरू झाले नसल्याचे सूत्रांच्याकडून समजते. ऑफलाईन विज्ञान प्रदर्शन पाहता येत नसल्यामुळे अनेक जिज्ञासू विद्यार्थ्यांना तालुक्याच्या शाळांतून आलेल्या प्रयोग प्रतिकृतींचे अध्ययन करण्याची संधी त्यांच्यापासून हिरावली जात आहे. गटशिक्षण विभागाने पुनश्च ऑफलाइन पद्धतीने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचे बाबत गांभीर्याने विचार करावा असा सूर विद्यार्थी आणि शिक्षकांच्यातून उमटत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यंदाच्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून ७२ तर माध्यमिक गटातून ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रिन्सिपल संगीता पाटील यांनी पराग मोरे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Be First to Comment