रायगड जिल्हा बाहेरील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार “बहाल”
माजी समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांची शिफारस
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
रायगड जिल्हा परिषदेने 6 मार्च 2022 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या मानाचा असणाऱ्या रायगड भूषण पुरस्काराचे तब्बल २५७ व्यक्तींना रायगड भूषण ने सन्मानित केले.मात्र यावेळी रायगड जिल्ह्यातील रहिवासी नसलेल्या ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील नामदेव ना. बैकर यांनासुद्धा रायगड भूषण पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले आहे.
बैकर यांना सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला असून यासाठी माजी समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांचे शिफारस पत्र जोडले आहे. रायगड जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार या चर्चेला उत आला असून रायगड जिल्हा परिषदेने पुरस्कार देताना कोणत्या प्रकारची शहानिशा केली आहे ? असाही प्रश्न उदभवत आहे. त्याचप्रमाणे एखादं दोन पुरस्काराने सन्मानित आलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असण्याचा देखील संशय व्यक्त होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेवर चोहोबाजूंनी टीका होत आहे त्यातच ठाणे जिल्ह्यातील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार देण्याचा पराक्रम रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रायगड जिल्ह्याच्या जडणघडणीत मोठे योगदान असलेल्या ठराविक व्यक्तींना जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत मात्र या वर्षी दि. ६ मार्च तब्बल २५७ व्यक्तींना रायगड भूषण ने सन्मानित करण्यात आले. रायगड भूषणची ही खैरात पाहून सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमे यांनी रायगड जिल्हा परिषदेवर जोरदार टीका केली होती. त्यातच ठाणे जिल्ह्यातील नामदेव बैकर यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन रायगड जिल्हा परिषदेने गोंधळ उडवून दिला आहे.
नामदेव बैकर हे वांगणीजवळील ढवळेपाडा तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील मूळ रहिवासी असून सध्या त्यांचे वास्तव्य बदलापूर नगर परिषद हद्दीमधील खरवई येथे राहता आहे. ते ज्ञानकमळ शिक्षण संस्था वांगणी जिल्हा ठाणे या संस्थेचे सचिव आहेत. त्यांना रायगड भूषण जाहीर करताना पुरस्कार गठन समितीचे त्यांच्या पत्याबद्दल काही आक्षेप घेतला नाही काय ? या पुरस्कारासाठी स्टँम्प पेपरवर सत्यप्रतिज्ञापत्र द्यायचे असते त्यात नामदेव बैकर कोणत्या जिल्ह्यातील आहेत ? याची खात्री रायगड जि.प.पुरस्कार समितीने केली नाही काय ?
याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी सांगितले की, माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी बाहेर असून 16 मार्च 2022 रोजी जिल्हापरिषदमध्ये माहिती घेतल्यानंतर समजेल.
रायगड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी किरण रावलयांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की,तुम्ही अर्ज करा त्यानंतर दोन तीन दिवसांनी तुम्हाला माहिती मिळेल.













Be First to Comment