Press "Enter" to skip to content

सर्व 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड

पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची एकहाती सत्ता

ही तर आगामी निवडणुकीची नांदी : आमदार बाळाराम पाटील

पहा आमदार बाळाराम पाटील आणि काशीनाथ पाटील यांची प्रतिक्रिया 👇

सिटी बेल • पनवेल •

पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयामध्ये संपन्न झाली.यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व ११ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जवळपास साडेसातशे शेतकरी सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या बिनविरोध सदस्य निवडीमुळे ग्रामीण विभागातील राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाची मजबूत पकड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा विजय म्हणजे आगामी निवडणुकीची नांदी आहे अशी प्रतिक्रिया आमदार बाळाराम पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेनंतर दिली.

रविवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक दत्तात्रय धायगुडे यांनी निवडणुकीच्या कामकाजास सुरुवात केली. सार्वत्रिक सभांच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले असल्या कारणामुळे, शेतकरी सभासद यांच्या सार्वत्रिक सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यामध्ये मनोहर पाटील,राजेंद्र घरत, दत्तात्रय मोरे, रवींद्र पाटील, गणेश गायकर, दिनकर मुंढे, नारायण तुपे, गणेश कोळी, अनंता कांबळे, मीरा म्हात्रे, लिला भस्मा. आधी मान्यवरांची बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली असून वामन शेळके यांची तज्ञ संचालक म्हणून फेर निवड करण्यात येणार आहे.

यानंतर प्रसिद्धीमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, नुकतीच गव्हाण येथील विविध सोसायट्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली, कर्नाळा बँकेतील ठेवीदारांच्या व खातेदारांच्या विमा संरक्षित रकमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, आणि आज सहकारी भात गिरणी वरती पुन्हा एकदा लालबावटा फडकला. शेतकरी कामगार पक्ष संपला असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा असा हा आजचा नेत्रदीपक विजय आहे.

तर आपले मनोगत व्यक्त करताना पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाच्या सुवर्णकाळात अशाप्रकारे उत्स्फूर्तपणे शेतकरी सभासद निवडणुकी मध्ये सहभागी होत असत, दरम्यानच्या कालखंडात आम्हाला संघर्ष करावा लागला, परंतु आज ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षावरती विश्वास ठेवणारे शेतकरी बांधव उत्स्फूर्तपणे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाले ते पाहून खरोखरच समाधान लाभत आहे.

यावेळी बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, तालुका चिटणीस राजेश केणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.