
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी, निर्मिती,पारेषण,वितरण वीज कंपन्या मधील ८६००० कर्मचाऱ्यांना रू.२०००० सानुग्रह अनुदान/बोनस दिवाळीपूर्वी देणार
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना ८६००० वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी रु.२५,००० सानुग्रह अनुदान/ बोनस जाहीर करावा ही मागणी लेखी पत्राद्वारे केली होती.महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी कृती समिती १८ संघटनाच्या वतीने लेखी पत्राद्वारे बोनसची मागणी मुख्यमंत्र्याकडे यांच्याकडे केली होती. महावितरण कंपनीस सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांमध्ये रू.१२३४.१६ कोटी, महानिर्मिती कंपनीस ४५१.९८ तर महापारेषण कंपनीस रु.२४३८ कोटी नफा झालेला आहे.

महावितरण कंपनीने महसुलामध्ये अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगार व वीज ग्राहकास प्रशिक्षित करून अपघात कमी करण्याकरिता केलेल्या उपाययोजना, राज्यातील शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप योजना राबवून वीजपुरवठा केल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे.तिन्ही वीज कंपन्याना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे.वरील लक्ष गाठण्याकरिता तिन्ही वीज कंपन्या मधील कर्मचारी, अभियंते,अधिकारी, सहाय्यक व कंत्राटी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे.
कामगार संघटनांच्या मागणीनतंर तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याबाबतचा प्रस्ताव वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निर्मिती,वितरण व पारेषण यांना सादर केला होता. त्यांनी मान्यता प्रदान केल्यानंतर मा. अप्पर मुख्य सचिव ऊर्जा यांच्या मान्यतेस शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला.अपर मुख्य सचिव ऊर्जा यांनी मा.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या बरोबर विचार करून कर्मचारी, अभियंते,अधिकारी यांना रु.२००००/-तर विद्युत सहाय्यक यांना रु.१४,०००/-सानुग्रह अनुदान /बोनस जाहीर केलेला आहे. याबाबतचे माहिती वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा व सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे केलेली आहे.


Be First to Comment