Press "Enter" to skip to content

दृष्ट न लागो….

      न्यूझीलंड मधल्या ऑकलंड येथील एडन पार्क वरती झालेल्या पहिल्या वन डे इंटरनॅशनल सामन्या बद्दल अग्रलेख लिहावा इतका काही तो महत्त्वाचा नव्हता. तरी देखील काही निरीक्षणे नोंदवावीशी वाटली. याचे मुख्य कारण म्हणजे क्रिकेटमधील भवितव्य वर्तवताना सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंचे फॉर्म,टाइमिंग आणि त्यांचे प्रयत्न या त्रिसूत्रीचा धांडोळा घेऊन अडाखे बांधावे लागतात. आगामी विश्वचषकामध्ये भारताचे नक्की काय होणार? याबद्दल चर्चांचे मोहोळ सुरू असताना पहिल्या सामन्यातील काही सकारात्मक गोष्टींनी "संभाव्य विजेता" म्हणून भारताला अग्रक्रमी नेऊन ठेवले आहे.
       विराट कोहली ची स्टेट ऑफ द आर्ट हाफ सेंचुरी पाहायला भन्नाट मजा आली. किवी प्रेक्षकांनी सुद्धा त्याचा मनमुराद आनंद लुटला. माझ्या लेखी विराटची ती हाफ सेंचुरी म्हणजे एखाद्या चाकरमान्याने घरनं डबा उचलावा, ट्रेन पकडावी, ऑफिस ला जाऊन काम करावं,पुन्हा परतीची ट्रेन पकडावी आणि घरी यावं इतकी अंगवळणी पडणारी होती. रोहित हा कायम "इम्पॅक्ट मेकिंग प्लेअर" म्हणून खेळत आलाय त्यामुळे त्याचे शून्यावर आऊट होणे कधीच धास्तावणारे नसते. या सामन्यात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरणात पहिल्यांदाच त्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. टी ट्वेंटी फॉरमॅट मधले पाचही सामने म्हणजे "आओ भर भर के ले जाओ" अशा स्कीम मध्ये फास्टर बॉलर्सची पिसे काढत होते. पहिल्या वनडे इंटरनॅशनल मध्ये अंशुल कंबोज ने जी टप्पा पकडून बॉलिंग केली त्याला तोड नाही.अंशुल कंबोजने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत १० षटकांत केवळ २२ धावा देऊन २ महत्त्वाचे बळी मिळवले. हर्षदीप सिंगने चार विकेट्स मिळवल्या खऱ्या पण टाईट बॉलिंग करून अंशुलने माहोल बनवला. 
         बाकी आकडेवारी सगळ्यांना ठाऊक असेलच. पण या सामन्यात मला विशेष दखल घ्यायला भाग पाडले ते रोकोच्या फिल्डिंग एफर्ट्सने. रोहित ने केलेला रन आउट आणि विराट ने सेकंड स्लिप मध्ये उचललेला डायव्हिंग कॅच यांचा स्तर फार फार वरच्या दर्जाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ३८ आणि ३९ व्या वर्षी हे दोघे या लेवलची फील्डिंग करून टीम इंडिया मधल्या नवोदितांना प्रेरित करत आहेत.ज्या वयात जगातील तमाम लिजंड प्लेयर्सना लपवावे लागते त्याच वयात हे दोघे चॅलेंजिंग पोझिशन वरती उभे राहून ठोकून परफॉर्म करत आहेत.
      विराट आजही त्याच एलिगन्सने टाईम करतोय. रोहित या सामन्यात अपयशी ठरला असेल खरा पण त्याचा बॅटिंग पॅटर्न तसाच आहे.त्यांचे फील्डिंग मधले योगदान हे ११०% होते. दोन-चार मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर स्टारडम आलेले अनेक खेळाडू आपल्यासमोर आहेत. अशा सगळ्या शायनर खेळाडूंच्या डोळ्यात अंजन टाकणारे परफॉर्मन्स या दोघांनी दाखवले. अंशुल ची शिस्तबद्ध लाइन आणि लेन्थ बरेच काही सांगून गेली वास्तविक त्याला सामनावीर म्हणून पुरस्कार दिल्यानंतर अनेक उलट्या सुलट्या चर्चा सोशल मीडिया वरती वाचण्यात आल्या. परंतु या मॅच मधील त्याच्या शिस्तबद्ध गोलंदाजीचं महात्म्य आणि महत्व समजायला सामन्याकडे अष्टावधानी नजरेतून पहावं लागेल. अंशुल ने पाया रचला आणि विराट ने कळस चढविला पण पाया रचणे जास्त अवघड होते.
        मी स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असताना माझ्या कोच ने मला एक विस्मयकारक प्रकार सांगितला होता. आल्या आल्या दोन-चार मॅन ऑफ द मॅच घेतलेले बॉलर्स फार काळ टिकत नाहीत. डेब्यू केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोकून, मार खाऊन आलेले बॉलर्स नेहेमीच जास्त चांगले करिअर करतात. हे लॉजिक कदाचित अंशुल कंबोज याला लागू पडावे.कारण त्याने याच्या आधी ज्या उपट्या खाल्ल्या आहेत, ती मार झोड आपण पाहिलीच आहे.आगामी चार सामन्यात आणखीन नूर पालटेल पण रोहित विराट यांच्या तयारीला दृष्ट न लागो हिच सदिच्छा!
        

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.